अमरांते, कळंबोली, सेक्टर ९-ई

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई, पनवेल परिसरात अत्याधुनिक सुविधा असणारी अनेक संकुले आहेत, पण विकासाच्या नादात निसर्गाचा ऱ्हास होणार नाही, याची काळजी घेणारी संकुले मोजकीच. कळंबोली येथील अमरांते या १००० कुटुंबांच्या संकुलाने नव्या-जुन्याची सांगड घातली आहे.

अनेक संकुलांचा विकास करताना आधी अत्याधुनिक सोयी-सुविधा दिल्या जातात, मात्र नंतर जेव्हा त्या सुविधांचे नियोजन झेपेनासे होते, तेव्हा रहिवासी निसर्गाकडे वळतात. नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन, पर्यावरणाचा समतोल या साऱ्याची उपरती उशिराने होते. कळंबोली येथील अमरांते हे संकुलाने मात्र हा उलटा प्रवास टाळला. संकुल स्थापन करतानाच नैसर्गिक साधसंपत्तीचे योग्य नियोजन करण्यात आले. संकुलातील सर्व अद्ययावत सोयीसुविधा पर्यावरणपूरक ठरतील, अशी रचना करण्यात आली.

कळंबोली सेक्टर-९ ई येथे २०१३ साली स्थापन झालेल्या अमरांते सोसायटीत एकूण १००० सदनिका आहेत. संकुल स्थापनेपासूनच सदस्यांनी कचऱ्यापासून खतनिर्मिती, पर्जन्यजलसंधारण, सौर ऊर्जेचा पथदिव्यांसाठी, पाणी गरम करण्यासाठी वापर अशा विविध मार्गानी नैसर्गिक साधनांचा योग्य पद्धतीने वापर करून घेतला आणि पर्यावरण रक्षणाला हातभार लावला. पनवेलमध्ये ओला व सुका कचरा वेगळा ठेवणे, कचऱ्यापासून जैविक खतनिर्मिती असे कोणतेही प्रयत्न करण्यात आलेले नाहीत, मात्र अमरांतेने त्यासाठी स्वतहून पावले उचलली आहेत. कचरा वर्गीकरण आणि खतनिर्मिती करणारे पनवेल पालिका हद्दीतील हे पहिले संकुल आहे, असा येथील रहिवाशांचा दावा आहे.

पर्जन्यजलसंधारण करून साठवलेल्या पाण्याचा वापर घरगुती कामांसाठी किंवा उद्यानांसाठी केला जातो. संकुलाच्या आवारातील दिव्यांसाठी सौरऊर्जेचा वापर केला जातो. कळंबोली शहरात एमआयडीसीतील विविध कंपन्यांमधून मोठय़ा प्रमाणावर रासायनिक सांडपाणी नाल्यात सोडले जाते. त्यामुळे जलप्रदूषणाची समस्या मोठी आहे. यात आणखी भर पडू नये म्हणून सोसायटीने स्वतंत्र सांडपाणी प्रकिया केंद्र सुरू केले आहे.

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला सोसायटीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या सोसायटीमध्ये तरुण व लहान मुलांची संख्या जास्त आहे. त्यांच्याती कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी चित्रकला, नृत्य, गायन, रांगोळी, टेनिस, बॅडमिंटन इत्यादी स्पर्धा घेतल्या जातात. सामाजिक कार्यासाठीही संकुल तत्पर असते. दर तीन महिन्यांतून एकदा सामाजिक संस्थांना व आश्रमांतील गरजूंना जीवनावश्यक वस्तू देऊन मदत करण्यात येते.

सांस्कृतिक वैविध्याचे जतन

विविध सोयीसुविधा निर्माण करतानाच सांस्कृतिक वैविध्य जपण्याचा प्रयत्नही आता सोसायटी करीत आहे. सोसायटीत राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिबिंब उमटावे, यासाठी एक वैशिष्टय़पूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत दर महिन्याला एक सण मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात येतो. गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, होळी, ईद, ख्रिसमस, पोंगल, ओणम, लोहरी इत्यादी सण साजरे करण्यात येतात. विविध धर्माचे आणि प्रांतांचे सांस्कृतिक वैविध्य जपणे त्याची ओळख करून घेणे, हा त्यामागचा उद्देश आहे.

पार्किंगसाठी बारकोड

सुरुवातीपासून अभिनव संकल्पना राबवणाऱ्या या सोसायटीने आपली प्रयोगशीलता कायम ठेवली आहे. आता सोसायटीच्या आवारात आगंतुक वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. त्यासाठी आरएफआयडी या अद्ययावत तंत्रप्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. सोसायटीतील प्रत्येकाच्या वाहनाला एक स्टिकर लावला जाईल. वाहन बाहेरून आत येत असताना त्या स्टिकरवरील कोड स्कॅन केला जाईल आणि मगच सोसायटीत प्रवेश दिला जाईल. त्यामुळे बाहेरील वाहनांना प्रवेश रोखणे सहज शक्य होणार आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amarante kalamboli sector 9e navi mumbai development
First published on: 05-09-2017 at 01:19 IST