माथेरानमध्ये तब्बल ४६० अश्व परवानाधारक; पर्यटकांविना हंगाम वाया
नवी मुंबई</strong> : कडक र्निबधामुळे ऐन सुट्टीच्या दिवसात बंद झालेल्या पर्यटनामुळे माथेरानमध्ये केवळ पर्यटनावर अवलंबून असलेल्या ४६० घोडय़ांची गेल्या वर्षीप्रमाणे पुन्हा उपासमार सुरु झाली आहे.
अश्वचालक व पालकांच्या प्रयत्नाने समाजातून घोडय़ांचे मुख्य खाद्य असलेला भुसा मदत स्वरुपात येत आहे पण त्याने काही दिवस मिळणारा खुराक संपल्यानंतर पुन्हा जैसे थे स्थिती होत आहे. गेल्या वर्षी या घोडय़ांची मार्चपासून उपासमार सुरू झाली होती. ती सप्टेंबपर्यंत कायम होती, त्यानंतर पाच महिने पर्यटन काही प्रमाणात सुरु झाले होते पण करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी शासनाने लागू केलेल्या र्निबधांमुळे घोडे आणि त्यांचे चालक-मालक पुन्हा हवालदिल झाले आहेत.
करोना साथीची रुग्णसंख्या फेब्रुवारी मध्ये वाढू लागली. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली. माथेरान नगरपरिषदेने पर्यटन टप्प्याटप्प्याने बंद केले. त्यामुळे गेला दीड महिना माथेरानमध्ये पर्यटक फिरकलेले नाहीत. पर्यटकांची घोडेस्वारी हा माथेरानमधील प्रमुख रोजगार असून २३० अश्वमालकांचे ४६० परवानाधारक घोडे आहेत. या सर्व घोडय़ांना दिवसाला किमान सहा ते सात किलो खुराक लागतो. त्यासाठी दोनशे ते तीनशे रुपये खर्च करावा लागत आहे. गेल्या वर्षी एकाच जागी हे घोडे उभे राािहल्याने त्यांना शारीरिक व्याधींना समोरे जावे लागले होते. पर्यटन बंद असल्याने घोडेस्वारी बंद होते. अनेक अश्वचालक या काळात पर्यायी (मजुरी) कामे करीत असतात पण या कामांची देखील वानवा आहे. त्यामुळे घोडे आणि घोडेचालक यांची माथेरानमध्ये उपासमार सुरू झाली आहे. समाजातील काही प्राणीप्रेमी संस्था, दानशूर व्यक्ती या घोडय़ांच्या खुराकासाठी काही मदत करीत असतात. काही प्राणी खाद्य बनविणाऱ्या कंपन्या हे खाद्य देण्याचा प्रयत्न करतात. घोडय़ांना भुसा, गवत आणि काही प्रमाणात गहू द्यावे लागत असल्याने इतर वस्तुंची अश्वचालकांना जुळवाजुळव करावी लागत आहे. पोलीस महानिरीक्षक रवींद्र सेनगावकर यांच्या पुढाकाराने दीड लाख किमतीचा भुसा या घोडय़ांना वाटप केला आहे. घोडे चालक-मालकांपैकी अनेकांनी घोडे विकण्याची तयारी सुरू केली आहे.
गेली दोन वर्षे ऐन उन्हाळा आणि सुट्टीच्या काळात ही उपासमार सुरू आहे. घोडय़ांसाठी आम्ही एकवेळ पोटाला चिमटा घेत असतो. पण त्यांची उपासमार बघवत नाही. करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत ही स्थिती आहे तर तिसऱ्या लाटेत काय होईल या कल्पनेने अंगावर काटा येतो. गाडी बंद असली तरी चालते परंतु, सजीव घोडय़ांची उपासमार उघडय़ा डोळ्यांनी कशी बघावी, मदत मिळत आहे पण हे किती काळ चालणार, पुन्हा मदतीसाठी हात पसरावे लागणार आहेत.
– राकेश कोकळे, अश्वचालक, माथेरान
