२७ शेतकऱ्यांना २० लाख ४१ रक्कम अदा

नवी मुंबई :  मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा-बटाटा बाजार आवारात नाशिक आणि अहमदनगर येथील एकूण २७ शेतकऱ्यांनी त्यांचा कांदा हा शेतमाल  मे. कादरी ट्रेिडग कंपनी गाळा क्र. ई-९९ यांच्याकडे विक्रीसाठी पाठवला होता. मात्र या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची विक्री रक्कम दिली नव्हती. त्यामुळे या संबंधित शेतकऱ्यांनी एपीएमसीकडे तक्रार केली होती. एपीएमसी प्रशासनाकडून त्या शेतकऱ्यांना त्याची २० लाख ४१ हजार थकीत रक्कम धनादेशद्वारे मिळवून देण्यात आली आहे. एपीएमसी बाजार समितीत शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमी भाव आणि कोणतीही फसवणूक होणार नाही या विश्वासाने एपीएमसी बाजारात शेतमाल विक्रीसाठी पाठविला जातो. त्याचबरोबर महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ नुसार शेतमालाची विक्री झाल्यानंतर २४ तासांत संबंधित व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना रक्कम अदा करणे बंधनकारक असते. व्यापाऱ्याने शेतकऱ्यांच्या शेतमालाची रक्कम न दिल्यास किंवा शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्यास त्याच्याविरोधात कारवाई करण्याचे अधिकार एपीएमसी प्रशासनाला आहेत. मात्र तरीदेखील आजही एपीएमसी बाजार आवारात शेतकऱ्यांची फसवणूक होत असते. व्यापाऱ्यांकडून कित्येक शेतकऱ्यांची शेतमाल विक्री रक्कम थकवली जात आहे.

कांदा बटाटा बाजार आवारातील २० ते २५ गाळेधारक, बिगरगाळेधारक यांनी ५ कोटी थकबाकी ठेवली आहे. सन २०१० पासून २०१९ पर्यंत ३ कोटी होती, तर मागील दोन वर्षांत २ कोटींपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ही थकबाकी मिळवण्यासाठी नाहक त्रास होत आहे. अहमदनगर येथील अशाच एकूण २७ शेतकऱ्यांचे थकबाकी कादरी ट्रेडिंग कंपनी गाळा क्र. ई-९९ यांच्याकडे होती.  दरम्यानच्या कालावधीत सदर कंपनीचे चालक इस्लाम इस्माईल इद्रिसी यांचे करोना कालावधीत निधन झाले असल्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे अडकले होते. त्यामुळे याबाबत दाद मागणीसाठी  कांदा उत्पादक शेतकरी यांनी बाजार समितीकडे कांदा शेतमाल विक्रीची रक्कम मिळणेबाबत विनंती केली होती. याबाबत बाजार समितीमार्फत संचालक  अशोक देवराम वाळुंज तसेच मालक यांच्या वतीने  त्यांचे आप्तेष्ट व्यापारी  नसीमभाई सिद्धिकी, बाजार आवाराचे उपसचिव विठ्ठल राठोड आणि बाळासाहेब टाव्हरे, यांनी रक्कम वसूल करण्यासाठी पाठपुरावा केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अखेर पाठपुरावा करून १३ जानेवारी रोजी शेतमाल विक्रीची रक्कम रुपये २० लाख ४१ हजार रुपयांचे धनादेश बाजार समितीचे  सचिव प्रकाश अष्टेकर यांच्या हस्ते नाशिक येथील शेतकरी बाळू पुंजाराम जामदार व इतर शेतकरी तसेच अहमदनगर येथील मोहसीन अख्तार पठाण यांना अदा  करण्यात आली आहे. याबाबत संबंधित उपस्थित शेतकऱ्यांनी धनादेश मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलेले आहे, अशी माहिती उपसचिव विठ्ठल राठोड यांनी दिली आहे.