जगात समस्या आहेत, पण त्यावर उपायही आहेत. दिवसागणिक पृथ्वीला काळ्याकुट्ट भविष्याकडे ओढत नेणाऱ्या प्रदूषणकारी कोळशावरील उद्योगांना पर्याय म्हणून जैवइंधन विटा तयार करून स्वच्छ, सुंदर जीवनाची वीट रचणाऱ्या ‘केसी इन्फ्रा’ची ही यशोगाथा..
पर्यावरणाला घातक ठरत असलेल्या कोळशाला पर्याय म्हणून देशात अनेक ठिकाणी जैवइंधन (बायोमास) प्रकल्प उभे केले जात आहेत. ऐरोली येथील एका तरुणाने या उद्योगाला महत्त्व दिले. विद्युत अभियांत्रिकी विभागात पदविका संपादन करून बायोमास विटा बनविण्याचा यवतमाळ येथे कारखाना सुरू केला आणि अल्पावधीतच या क्षेत्रात योगेश चव्हाण याने यश संपादन केले.
केंद्र सरकारच्या धोरणांचा लाभ उठवून चव्हाण यांनी तीन हजार टन बायोमास विटांचे उत्पादन करण्याचे आव्हान सहज पेलले आहे. हे ध्येय लवकरच ५० हजार मेट्रिक टनापर्यंत जाणार आहे. चव्हाण यांच्या ‘केसी इन्फ्रा’च्या या विटा आज मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक येथील अनेक रासायनिक कारखान्यांना पुरवल्या जात आहेत.
वाशिम जिल्ह्य़ातील फुलउमरी गावातील शेतकरी कुटुंबातील योगेशने अभियांत्रिकी शिक्षण नवी मुंबईत राहून पूर्ण केले.
शिक्षण पूर्ण करीत असतानाच उद्योग-व्यवसायाची मनीषा बाळगलेल्या योगेशने प्रारंभी एका इलेक्ट्रिक कंत्राटदाराकडे माहिना पगारावर काम सुरू केले. त्यातून थोडा अनुभव गाठीशी आल्यानंतर महावितरण कंपनीतील अनेक अभियंत्यांनी स्वत: विद्युत कंत्राटदार म्हणून काम करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे केसी इंटरप्राईजेस या नावाने व्यवसाय सुरू झाला. आजघडीला केसी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडची वार्षिक उलाढाल दीडशे कोटी रुपयांच्या घरात आहे.
‘महावितरण’ने जुने मीटर बदलण्याचे राज्य पातळीवर सुरू केलेल्या प्रकल्पाचा ठाणे नवी मुंबईतील एक भाग या केसी कंपनीने यशस्वी पूर्ण केल्यामुळे विद्युत क्षेत्रात या कंपनीचे स्थान आहे. त्याचा फायदा पुढे योगेश यांना झाला. उद्योग विस्तार सुरू करण्यात अनुभव कामी आला.
याआधी नवी मुंबई पालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून योगेश यांनी पाच वर्षे नोकरी केली. त्यानंतर नोकरीचा राजीनामा देत उद्योगाची कास धरली. अतिशय छोटय़ा जागेत शंभर केव्ही क्षमतेचे ऐरोली येथील रिलायबल कंपनीत राज्यातील पहिले संकरित उपकेंद्र (हायब्रीड सबस्टेशन) उभारण्याचा मान ‘केसी’कडे जातो.
त्याचमुळे नंतर सीएट, जिंदाल ग्रुप, बजाज इलेक्ट्रिकल यांसारख्या बडय़ा कंपन्यांमधील विद्युत कामे केसी इन्फ्राकडे चालून आली.
विद्युत क्षेत्रात सौर उर्जा ते बॅटरी उत्पादनापर्यंत विविध क्षेत्रांत सहज मुशाफिरी करताना जैवइंधन उद्योगाला प्रथम प्राधान्य देण्याचा निर्णय चव्हाण यांच्या कंपनीने घेतला आहे. आज देशात अनेक वृक्षांची कत्तल केवळ कोळसा उपयोगासाठी केली जात आहे. त्यामुळे प्रदूषणाला तर हातभार लागत आहेच, पण पर्यावरणाची अतोनात हानी होत असल्याने कोळशाला पर्याय ठरणाऱ्या बायोमास ब्रिक्वेटचे उत्पादन केसीने यवतमाळ येथे नऊ एकरच्या जागेत सुरू केले आहे.
शेतीत निर्माण होणाऱ्या कचऱ्यापासून जैवइंधन विटा वा लगदा बनविल्या जात आहेत. त्या सध्या राज्याच्या कानाकोपऱ्यात आवश्यक ठिकाणी पोहोचविल्या जात आहेत. त्यामुळे कोळशावर चालणारे बॉयलर जवळपास बंद करण्यात आले आहेत. सध्या देशात केसीच्या विटांना मोठी मागणी आहे.
इलेक्ट्रिक व्हेकलसाठी लागणाऱ्या बॅटरीचे उत्पादन महापे येथील कंपनीतून केले जात आहे.
दुबईतील बसथांब्यावर सौरऊर्जेसाठीची पॅनल तयार करण्याचे आव्हान ‘केसी’ला पेलायचे आहे. उस्मानाबाद येथे १०० मेगाव्ॉट विद्युत वीज तयार करण्याच्या प्रकल्पाचे कामही सुरू करण्यात आले आहे.
