उरण : अटल सेतू व उरण ते नेरुळ लोकलमुळे मोरा – मुंबई जलवाहतुकीवर परिणाम झाला असून प्रवासी संख्या कमी झाली आहे. यात सध्या समुद्राच्या वाढत्या ओहटीची भर पडली आहे. ओहटीच्या वेळी मोरा बंदरात मोठया प्रमाणात गाळ साचल्याने या मार्गावरील बोटी रुतण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून ही सेवा बंद करण्यात आली आहे. सोमवारी साडेपाच तास सेवा बंद होती. मंगळवार आणि बुधवारीही सेवा पाच तासांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मोरा बंदर अधिकारी नितीन कोळी यांनी दिली.

मोरा बंदरात गाळ सचण्याची समस्या कायमस्वरूपी आहे. हा गाळ काढण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही ही समस्या सुटलेली नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून उरणच्या मोरा व मुंबईतील भाऊचा धक्का दरम्यान मोरा मुंबई जलसेवा सुरू आहे. या जलसेवेमुळे उरणवरून विनाअडथळा मुंबईत अवघ्या अर्ध्या ते एक तासात या मार्गाने पोहचता येते. त्यामुळे उरण मधील चाकरमानी, व्यवसायिक आणि सर्वसामान्य प्रवासीही याच मार्गाचा वापर करतात. मोरा मुंबई जलसेवा ही उरण आणि मुंबई दरम्याची महत्वाची सेवा आहे.

हेही वाचा…नवी मुंबईत कचऱ्याचे ढीग; ऐरोली, घणसोली, कोपरखैरणेत स्वच्छ भारत मोहिमेची ऐशीतैशी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र ही सेवा सुरळीत सुरू ठेवण्याची जबाबदारी ही महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या अभियांत्रिकी विभागाची आहे. मात्र या विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ही सेवा खंडीत होत आहे. नोव्हेंबरपासून ओहटीत वाढ होते. त्यामुळे किनाऱ्यावर प्रवासी बोटी आणता येत नाही. तर अशा प्रकारच्या गाळात अनेकदा प्रवासी बोटी रुतल्याने प्रवासी अडकून पडल्याच्याही घटना घडल्या आहेत. त्याचप्रमाणे धुक्यात बोटी आपला मार्ग चुकल्याच्याही घटना घडल्या आहेत. अनेक कारणाने या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत. यात मोरा बंदरावरील असुविधांचाही सामना प्रवाशांना करावा लागत आहे. या प्रवासी समस्या सोडविण्यास महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड अपयशी ठरल आहे. या संदर्भात महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या अभियांत्रिकी विभागाचे अभियंते यांना माहिती घेण्यासाठी संदेश पाठवून संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.