नवी मुंबई : बेलापूर विधानसभा मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर बोगस आणि दुबार नावे असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. मनसेच्या वतीने नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी सोमवारी (२८ ऑक्टोबर) दुपारी कोकण भवन येथे निवडणूक निर्णय अधिकारी विकास गरुडकर यांची भेट घेऊन या प्रकरणाबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी काळे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा स्मरणपत्र देत, बेलापूर मतदार यादीतील सुमारे १८,४०३ बोगस आणि १५,००० दुबार मतदारांची नावे यादीतून तात्काळ वगळण्याची मागणी केली आहे.

बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी पैशांच्या बदल्यात अधिकाऱ्यांकडून मतदारांची नावे नोंदवली जात असल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर या आरोपांचा जाब विचारण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याच्या मागणीसाठी मनसेच्या शिष्टमंडळाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी मनसेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पक्षाने २०२४ आणि २०२५ मध्ये दोन वेळा या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या मतदार यादीची छाननी करताना मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळून आल्याचा दावाही मनसेने केला आहे. त्यामुळे एक वर्षापूर्वीच ही यादी निवडणूक आयोगाकडे दिली असूनही अद्याप त्यावर ठोस कारवाई झालेली नसल्याचा जाब यावेळी मनसे शिष्टमंडळाने निर्णय अधिकाऱ्यांना विचारला. त्यावर विकास गरुडकर यांनी आतापर्यंत सुमारे ४ ते ५ हजार दुबार नावे वगळली गेल्याचे सांगितले. उर्वरित नावांवरही कार्यवाही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

मात्र, या कारवाईबाबत कोणतीही पारदर्शक माहिती दिली गेली नसल्याचेही मनसेचे म्हणणे आहे. वगळलेल्या आणि नव्याने समाविष्ट झालेल्या नावांची तपशीलवार यादी, पत्ता आणि कारणासह जाहीर करण्यात येत नसल्याची तक्रार मनसेने केली. ही माहिती पारदर्शकतेसाठी जाहीर करण्याची मागणी गजानन काळे यांनी केली. तसेच मृत व्यक्तींची नावे वगळण्यासाठी आवश्यक असलेले मृत्यू दाखले महानगरपालिकेकडून तातडीने घेण्याची सूचना मनसेने केली, जी निवडणूक अधिकाऱ्यांनी मान्य केली आहे.

मनसेने या बैठकीत पत्ता सापडत नसलेल्या १५ हजार बोगस नावांची स्वतंत्र छाननी करण्याची मागणी केली. यावर प्रतिक्रिया देताना निर्णय अधिकाऱ्यांनी, “अशा मतदारांचा वास्तव्याचा पुरावा तपासून योग्य पंचनामा करून नावे वगळण्याची कार्यवाही करण्यात येईल.” अशी हमी दिली आहे.

मतदाराच्या पत्ता चक्क सुलभ शौचालय!

या बैठकीदरम्यान मनसेने दिलेल्या यादीतील बेलापूर मतदार यादी क्रमांक १४८ मधील अनुक्रमांक ५१ च्या मतदाराचा पत्ता चक्क ‘सुलभ शौचालय’ असल्याचा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. “हा घोळ नेमका कोणत्या अधिकाऱ्यामुळे झाला?” असा सवाल गजानन काळे यांनी निर्णय अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला. मात्र, बैठकीदरम्यान निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी १ नोव्हेंबरपासून बोगस नावे वगळण्याचे काम प्राधान्याने सुरू होणार असल्याची माहिती दिली. या मोहिमेत मनसेचे बुथस्थरिय प्रतिनिधी आणि गटअध्यक्ष सक्रीय सहभाग घेऊन मतदार यादी शुद्धीकरणाचे काम करतील, अशी ग्वाही गजानन काळे यांनी दिली.

दरम्यान, मतदार यादीतील कथित घोळ आणि मत चोरीच्या विरोधात १ नोव्हेंबर रोजी मुंबईत काढण्यात येणाऱ्या सर्वपक्षीय मोर्चाची तयारी स्थानिक पातळीवर सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाविरोधात हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील मतदार याद्यांमधील घोळ ही बाहेर आले असून, मनसे याबाबत आक्रमक झाली आहे. त्यामुळे या १ तारखेच्या सर्वपक्षीय मोर्च्यात नेमके काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.