नवी मुंबईत दैनंदिन व्यवहार नियमीत; पनवेल, उरणमध्ये बंदला प्रतिसाद

नवी मुंबई : तुर्भे येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील पाच घाऊक बाजारपेठा वगळता शहरातील सर्व दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू होते. भाजप वगळता बहुतांशी सर्वच राजकीय पक्षांनी या बंदला पाठिंबा दिलेला असताना नवी मुंबईत त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही.

शीव-पनवेल व ठाणे-बेलापूर या दोन महामार्गावरील तसेच अंतर्गत वाहतूक सुरळीत होती. नवी मुंबईतील दोन्ही आमदार हे भाजपचे असून शिवसेनेने केवळ पाठिंबा देताना शांतपणे बंद करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे शहरातील काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या बोटावर मोजण्याइतक्याच कार्यकर्त्यांनी मोक्याच्या ठिकाणी घोषणाबाजी करून फोटो सेशन केल्याचे चित्र होते.

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी विधेयकांच्या विरोधात चाळीस शेतकरी संघटनांनी गेले १३ दिवस दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी आज पाठिंबा देताना एकदिवसीय बंद पुकारला होता. त्याला नवी मुंबईत संमिश्र प्रतिसाद मिळाला. तुर्भे येथील एपीएमसीच्या पाच घाऊक बाजारपेठांतील व्यापारी आणि माथाडी या प्रमुख घटकांनी या बंदला पाठिंबा दिल्याने हा बंद केवळ एपीएमसी बाजारपेठेपुरता मर्यादित असल्याचे दिसून आले.

बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली या नोड व ग्रामीण झोपडपट्टी भागातील दैनंदिन व्यवहार सुरुळीत सुरू होते. शिवसेनेने हा राजकीय बंद नसून शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे स्षष्ट केल्याने शहरातील अपवाद वगळता सर्व पदाधिकारी यांनी घरीच बसणे सोयीस्कर मानले. काँग्रेस व राष्ट्रवादी या आघाडी सरकारमधील दोन प्रमुख पक्षांनी वाशी येथील शिवाजी चौकात काही मोजक्या कार्यकर्त्यांसह घोषणबाजी करून पाठिंबा दर्शविला. बंद दुपारी तीन वाजेपर्यंतच असल्याने त्यानंतर सर्व व्यवहार अधिक वेगात सुरू झाल्याचे चित्र होते. त्यामुळे नवी मुंबईत बंदला अतिशय अल्प प्रतिसाद मिळाला.

याउलट शेजारच्या उलवा व पनवेल भागात शेकापने या बंदला पाठिंबा देताना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन दुकानदारांना केले. त्यामुळे उलव्यात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.

पाचही बाजारपेठांत शुकशुकाट

नवी मुंबई :  नवीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून त्यांनी भारत बंदची हाक दिली होती. याला पाठिंबा देण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतही कडकडीत बंद पाळण्यात आला. येथील पाचही बाजार समित्यांची प्रवेशद्वारे दिवसभर बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे नेहमी गजबजलेल्या या परिसरात मंगळवारी शुकशुकाट होता.

नवीन कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांबरोबर व्यापारी व माथाडी या घटकांनाही मोठा फटका बसणार आहे. बाजार समितीबाहेर व्यापार करण्याची मुभा या कायद्यात असल्याने व्यापाऱ्यांचा व्यापार बुडणार असून माथाडींच्या हातचे काम कमी होणार आहे. बाजार समित्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार असल्याने बाजार घटकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार असल्याने नवीन कायदे अस्तित्वात येण्यापूर्वीपासूनच  त्यांनी विरोध दर्शवला होता. आता शेतकऱ्यांचे दिल्लीत या विरोधात आंदोलन सुरू असून त्यांनी भारत बंदची हाक दिली होती. त्यानुसार एपीएमसीतील व्यापारी, माथाडी, मापाडी, पालवाल महिला यांनी बंदमध्ये १०० टक्के सहभाग दाखवला. एपीएमसीतील पाचही बाजारांची प्रवेशद्वारे दिवसभर बंद होती. भाजीपाला, फळ बाजारात पहाटेच्या सुमारास व्यवहार सुरू होतात. मात्र मंगळवारी या ठिकाणीही व्यवहार झाले नाहीत. बाजारात एकही गाडी आली नसल्याचे एपीएमसी प्रशासनाने सांगितले. बाजारात आवारातील रस्त्यावरदेखील शांतता होती.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने बंदला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानुसार बाजार आवारात शंभर टक्के बंद पाळण्यात आला असे बाजार समितीचे सभापती अशाके ढक यांनी सांगितले.

आंदोलकांना वाशीतच रोखले

नवी मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील मरिन ड्राइव्ह येथे जात असलेल्या आंदोलकांना नवी मुंबई पोलिसांनी वाशीतच रोखले. काही वाहने पोलिसांची नजर चुकवून मुंबईच्या दिशेने गेली. मात्र त्यांनाही मानखुर्द येथे मुंबई पोलिसांनी रोखले. शेतकरी बंदच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत दिवसभर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

पंजाबी आणि हरियाणा भागांतील मुंबई, ठाणे, नवी मुंबई व पनवेल परिसरांत राहणाऱ्या नागरिकांनी मुंबईतील मरिन ड्राइव्ह येथे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एकत्र येण्याचे ठरविले होते. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी वाशीत सकाळपासूनच नाकाबंदी केली होती. सकाळी ११ ते १२  वाजण्याच्या सुमारास हे आंदोलक बस व लहान वाहनांतून मुंबईच्या दिशेने निघाले होते. ही वाहने पोलिसांनी वाशी प्लाझा येथेच अडवली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यातूनही काही आंदोलकांची वाहने पोलिसांची नजर चुकवून मुंबईच्या दिशेने गेली होती.  नवी मुंबई पोलिसांनी मुंबई पोलिसांशी संपर्क साधत या वाहनांना मानखुर्द येथे अडविण्यात आले. वाशीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी आंदोलकांची समजूत काढत त्यांना परत पाठवले.

चोख पोलीस बंदोबस्त

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत सर्वत्र पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. यासाठी २५० होमगार्ड, स्ट्राईकिंगची चार पथके तसेच मुख्यालयाकडून अतिरिक्त बंदोबस्तही देण्यात आला होता. यात एपीएमसी आणि शीव-पनवेल महामार्गावर अधिकचा बंदोबस्त होता.