‘तुम्ही चिकन-मटण खाता का हो, बरं; पण जास्त खाता का? काही नाही, जरा कमी खात जा!’ कट्टर शाकाहारीने मांसाहारींना दिलेला हा सल्ला कधी ना कधी तरी कुठे तरी कानावर आला असेलच. पण मासांहारींनी कधी जरा मेथीची भाजी जास्त खात असाल तर प्रमाण कमी करा, असं कधी ऐकलंय का, नसेलच!! उलट ती अधिक दणकून खाण्यासाठीचा आग्रहच जास्त केला असेल, नाही का?
पण नवी मुंबईत असे एक स्थळ आहे की, जिथे मांसाहार दाबून खाण्यासाठीचा सल्ला अनेक जण देतात. कोवळ्या लुसलुशीत चिकनमधून हाडांचा भाग अलगद बाजूला काढून ते अधिकच मऊशार केल्यानंतर त्याला लसूण आणि आल्याची ‘पेस्ट’ लावली जाते. मग मैद्याच्या पिठाचे गोळे बनवून त्यात चवदार चिकन घालून त्याचे रोल बनवले जातात.
घरातून निघताना अंमळ उशीर झाला आणि लोकल पकडायची घाई आहे. अशा गडबडगुंडय़ात पोटाचे हाल होऊ नयेत, म्हणून स्थानकाशेजारीच असलेल्या अशा ‘चिकन रोल्स’वर अनेकांचा डोळा असतो. पण तो शोधताना नजरही तितकीच तीक्ष्ण असायला हवी. अशा पारखी नजरवाल्यांचा मग जिभेवरचा ताबा सुटतो आणि काऊंटरवचा ‘चिकन रोल’ काही क्षणांत हातात पडलेला असतो. असा एक काऊंटर सध्या वाशीतील ‘भारत ए वन कोलकाता रोल’ नावाने खूपच चर्चेत आहे. खास चिकन रोलसाठी विविध भागांतून खवय्ये इथे येतात.
नौशाद शेख या बंगालच्या युवकाने मुंबईत येऊन नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. मुंबईत त्याचा काही टिकाव लागला नाही; पण नवी मुंबईने त्याला हात दिला. दर महिन्याची ‘पगारीवृत्ती’ सोडून नौसादने काम सोडून धंद्याचा विचार केला आणि तो कृतीतही आणला. वाशी रेल्वे स्थानक, वाशी प्लाझा आणि घणसोली येथे ‘चिकन रोल’चा धंदा चालू केला. त्यातही सुरुवातीला त्याचा जम बसला नाही.
त्यानंतर काही मित्रांच्या सल्ल्याने त्याने २०१४ मध्ये वाशी येथील ‘अपना बझार’च्या बसथांब्यासमोरील गाळ्यात ‘चिकन रोल’चा व्यवसाय सुरू केला. ‘कोलकाता चिकन रोल’ म्हणून असे दुकानाचे नामकरणही केले. नौसादने चिकन रोलमध्ये चवीवर अधिक भर दिला. याच वेळी माफक किंमत ठेवल्याने सर्वच स्तरातील लोक रोलसाठी गर्दी करतात.
दुपारी १२ वाजता दुकानाचा दरवाजा उघडतो. दिवसाला सुमारे पाच किलो चिकन, अर्धा किलो मटन पाव किलो पनीर आणि २००ग्रॅम चीझचा वापर रोल्स बनविण्यासाठी वापर केला जातो. चिकन रोल्समध्ये कोलकाता मसाला वापरला जातो, ही त्याची मोठी खासियत. रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येकाला आकर्षून घेईल, अशी दुकानाची रचना आहे. अपना बाजारमध्ये कार्यालयांची संख्या जास्त असल्याने कर्मचारी आणि अधिकारी वर्गाला चिकन रोल ही अनोखी मेजवानीच ठरत आहे.
मुंबईच्या वडापावप्रमाणेच कोलकात्याची चिकन रोल ही खासियत आहे. कोलकात्याशेजारील गावांमध्ये खास करून हा कोलकाता मसाल्याचा चिकन रोल बनवला जातो. तीच चव नवी मुंबईकरांनाही चाखण्याचा चंग बांधलेल्या नौसादने रोल्सच्या दर्जामध्ये कधीच तडजोड केली नाही, असे नौसाद आवर्जून सांगतो.
‘भारत एवन’मध्ये व्हेज चिकन रोल, रोस्टेड चिकन, एग्ज चिकन काठी रोल, डबल चिकन काठी रोल, चिकन चिली काठी रोल, एग्ज चिकन चिली काठी रोल, काशा चिकन रोल, एग्ज चिकन काशा रोल, वेज काशा रोल, मशरूम काशा रोल, मटन काशा रोल असे खाद्य वैविध्य नौसादने टिकवून ठेवले आहे. याशिवाय खास कोलकात्याच्या विशेष डिशही नौसाद मागणीप्रमाणे तयार करून देतो. या काजू ग्रेव्हीचाही समावेश असतो.
‘भारत ए वन कोलकाता रोल’
- स्थळ : अपना बझार बसथांब्यासमोर सेक्टर-१, वाशी
- वेळ : दुपारी १२ ते रात्री ११ पर्यंत