पनवेल : तळोजा औद्योगिक वसाहतीमधील खड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच आहे. जुलै महिन्यात झालेल्या अपघातामध्ये तरुणाच्या हातावरून अवजड वाहनाचे चाक गेल्याची घटना ताजी असताना शनिवारी (ता. २३ ऑ.) सकाळी तळोजातील सीईटीपी प्रकल्पाशेजारी गतिरोधकालगत असणा-या खड्यांमुळे एका दुचाकीस्वाराला आपले प्राण गमावण्याची वेळ आली.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वच सरकारी प्राधिकरणांना गणेशोत्सवात खड्डेमुक्त रस्ते ठेवण्याच्या सूचना दिल्यानंतरही तळोजातील औद्योगिक विकास महामंडळाला जाग आलेली नाही. त्यामुळे एका ३६ वर्षीय तरुणाला प्राण गमावण्याची वेळ आल्याची चर्चा परिसरात आहे.
शनिवारी सकाळी १० वाजता तळोजा येथील सीईटीपीसमोरून ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा येथे राहणारे ३६ वर्षीय विवेक तिवारी हे रोडपाली येथे दुचाकीने जात असताना डंपरने भरधाव धडक दिल्यामुळे विवेक यांचा पाय डंपरच्या चाकाखाली आला. विवेक यांच्या मांडीला जबर दुखापत झाल्यावर वाहतूक पोलीस कर्मचारी नितिन भोसले यांनी त्यांना नजीकच्या आनंद रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने प्राणवायू लावून रुग्णवाहिकेने त्यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले. अखेर एमजीएम रुग्णालयात विवेक यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या दरम्यान घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक पोलिसांना तपास सुरू केला. डंपरचालक हिरालाल यादव याला या प्रकरणी ताब्यात घेतल्यावर तळोजा पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केल्यावर खड्यामुळे दुचाकी चालक अचानक समोर आल्याने अपघात घडल्याचे डंपर चालक हिरालाल याने पोलिसांना सांगीतले. पोलीस उपनिरीक्षक उमेश गुठाळ हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. विवेक हे खासगी कंपनीत नोकरी करतात. तळोजा पोलीस ठाण्यात या प्रकरणी डंपरचालक हिरालाल यादव याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
१३ जुलै रोजी औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यावरील खड्यामुळे रात्री अकरा वाजण्याच्या सूमारास कामावर जाणा-या प्रणव ठाकूर याचा भिषण अपघात झाला. गॅसबाटला भरून घेऊन चाललेल्या अवजड वाहनाने प्रणव चालवित असलेल्या ठोकर दिल्यानंतर गॅसबाटला घेऊन चाललेले अवजड वाहनाचे मागील चाक प्रणव यांच्या हातावरून गेल्यामुळे हाताच्या हाडावर तीन वेगवेगळ्या शस्त्रक्रीया कराव्या लागल्या. शस्त्रक्रीयेनंतर प्रणव यांच्या हाताच्या जखम सूकल्यानंतर त्यांच्या हातावर मसाज व व्यायामानंतर पहिल्यासारखे ते हाताचा वापर करू शकतील. या घटनेनंतर वाहनचालक फरार झाल्यामुळे रात्रीच्या वेळी चिखलात वैद्यकीय मदत प्रणव यांना उशीराने मिळाली.
या घटनेनंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अभियंता एस. व्ही. राऊत यांना विचारले असता त्यांनी सांगीतले, की आम्ही महिन्याभरापूर्वीच कॉंक्रीट मटेरीयल टाकून संबंधित खड्डे बुजवले होते. मात्र पावसामुळे खड्डे बुजविण्यासाठी टाकलेले मटेरीयल वाहून गेले आहेत. तरीही पुन्हा त्याच रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे खड्डे बुजविण्यासाठी ईपॉक्सी तंत्रज्ञान असलेले मटेरीयल टाकून येथील खड्डे बुजविण्याचे काम करण्यात येईल. मात्र हे मटेरीयल सुकण्यासाठी २४ तास कोरडे वातावरण लागते. त्यामुळे पावसाची उघडीप होण्याची वाट पाहत आहोत.