कोळसा महागला; शेती अवजारांमध्ये घट
सौ सुनार की, एक लुहार की.. बारा बलुतेदारांमधल्या लोहाराची ताकद त्याच्या एका घणाघातात कशी सामावलेली होती, याचे वर्णन करणारी ही म्हण. परंतु उरण तालुक्यात लोहाराचा हातोडा आताशा क्षीण पडू लागला आहे. शेतकऱ्यासाठी महत्त्वाचा घटक म्हणून आजवर स्थान असलेल्या लोहाराचा भाता ढणढणता ठेवण्यासाठी लागणारा कोळसा महागल्याने आणि शेतीचा परीघ दिवसेंदिवस आकुंचन पावत असल्याने परंपरागत लोहारकीवरच बरोजगारीचा घाव सोसावा लागत आहे.
मराठवाडय़ातून उदरनिर्वाहासाठी येणाऱ्या भटक्या विमुक्त जमातीतील या व्यावसायिकांना आर्थिक मदतीची सामाजिक न्यायाची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. पावसाळा संपला की राज्यातील विविध जिल्ह्य़ातून शेतकरी, कामगारांना लागणाऱ्या विविध वस्तू हत्यारे बनविण्याचा व्यवसाय करणारे लोहार गावोगावी आपली पाले टाकतात. अख्या कुटुंबीयासह आलेल्या या व्यवसायिकांना थंडी, ऊन यांची तमा न बाळगता अनेक संकटांवर मात करीत केवळ जगण्यासाठी हा व्यवसाय करावा लागतो. ओबडधोबड लोखंडाला भात्याच्या साहाय्याने कोळशातील ज्वालांवर तापवून लालबुंद करून त्यावर घणाचे घाव टाकून आकार दिला जातो. घणाचे घाव घालण्यासाठी घरातून गृहलक्ष्मीही व लहानगी मुलेही मदत करतात हे पाहून महिलांना कमी लेखणाऱ्यांची कीव करावीशी वाटते. पुरुषाप्रमाणेच या गृहिणी घणाचे घाव घालतात त्यामुळे व्यवसायाला मदतही होते.
उरणमधील शहर व गावात व्यवसाय करणाऱ्यांना नवी मुंबईतील कोपरखैरणे येथून भात्यासाठी कोळसा आणावा लागतो. मागील वर्षी १५ रुपये किलो असलेला कोळसा आता ३० रुपये किलोवर गेला आहे. तसेच हत्यारांकरिता लागणाऱ्या मुठीचे लाकूड व लोखंडही महाग झाले आहे. त्याचप्रमाणे उरणसारख्या शहर परिसरात राहून जीवन जगणे म्हणजे रोजचे कमवायचे आणि खर्च करायचे शिल्लकी शून्य असा संसाराचा गाडा चालवावा लागत असल्याचे मत उरण शहरात व्यवसाय करणाऱ्या विकास पवार यांनी दिले. त्याला दोन मुले असून ती उरण नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहेत. तर त्याने स्वत: १२ वी पर्यंत शिक्षण घेऊनही त्याला लोहार काम करावे लागत आहे.
गावी शेती आहे परंतु जगण्यासाठी उरणमध्येच रहावे लागते. तर सध्या उरणमधील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शेती व्यवसायातही घट होऊ लागल्याने शेतीच्या कामासाठी लागणारी अवजरांची मागणी कमी झाली आहे. याचाही परिणाम व्यवसायावर झाल्याने मिळेल ते काम करून कुटुंबाला जगवावे लागत असल्याची माहिती अकुंश खोर या लोहाराने दिली.