ब्लॅक स्मिथ टॉवर-१,ऐरोली
१ हजार मीटर क्षेत्रफळावर उभारलेले ब्लॅक स्मिथ टॉवर-१ हे संकुल उत्तम नियोजनातून सर्व आंनद मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. मोठय़ा सोसायटय़ांच्या बरोबरीने पाऊल टाकण्याचा प्रयत्न प्रशंसनीय आहे.
सुखी, समाधानी आयुष्यासाठी जसे माणसाच्या मनाचा मोठेपणा महत्त्वाचा असतो. त्याचप्रमाणे संकुलाला आधुनिक सुखांची सांगड घालण्यासाठी सोसायटीचे क्षेत्रफळ मोठेच असले पाहिजे ही धारणा ऐरोलीतील ब्लॅक स्मिथ टॉवर-१ येथील रहिवाशांनी मोडीत काढली आहे. छोटय़ा गोष्टीतही समाधान आणि आनंद शोधण्यात येथे अनेकजण दंग असतात.
ऐरोली येथे गजबजल्या ठिकाणी १ हजार मीटर क्षेत्रफळावर उभारलेले ब्लॅक स्मिथ टॉवर-१ हे संकुल उत्तम नियोजनातून सर्व आंनद मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. इतर बडय़ा सोसायटीच्या तुलनेत हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने जरी कमी पडत असले तरी, मोठय़ा सोसायटय़ांच्या बरोबरीने पाऊल टाकण्याचा रहिवाशांचा प्रयत्न प्रशंसनीय आहे. एकूण १८ सदनिका असलेल्या या संकुलात फार कमी जागा आहे. त्यातूनही सुनियोजन करून अनेक सुविधा कशा देता येतील, यावर भर दिला जात आहे.
संकुलास वेगळी अशी व्यायामशाळा नाही. तरीही येथील सदस्यांनी रहिवाशांच्या स्वास्थ्यासाठी संकुलाच्या कार्यालयात व्यायामाचे साहित्य ठेवण्यात आले आहे. त्याता काहीजण सकाळी व्यायाम करतात, तर काही जण सायंकाळी व्यायाम करतात. व्यायामाची साधने पुरेशी असल्याने अनेकांना त्याचा लाभ घेता येतो. छोटय़ा जागेत सोसायटीच्या सभोवती वृक्षारोपण करण्यात आले आहे. काही ठिकाणी रोपांच्या कुंडय़ा ठेवण्यात आल्या आहेत. प्रत्येक जिन्यात वेगवेगळी फुलांची रोपटीही स्वागतास हजर असतात.
पाण्याच्या स्वच्छतेची सदस्यांकडून काळजी घेतली जाते. येथील रहिवाशी जातीने लक्ष घालून पाण्याची टाकी वेळोवेळी स्वच्छ करून घेतात. काही दिवसांपूर्वी लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळीने ऐरोली शहरात दहशत निर्माण केली आहे. या भीतीने येथील रहिवाशी आपल्या मुलांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देत आहेत. या इमारतीच्या आवारात जाताना कोणालाही सहज प्रवेश दिला जात नाही. त्याचबरोबर जर कोणी नजरचुकीने आले तरी इमारतीमध्ये प्रवेश करण्याची मुभा त्याला नाही. या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या संकुलात एकवेळी आगीची घटना घडल्याने येथील नागरिक सदैव सतर्क असतात. येथील अग्निशमन यंत्रणा अधिक सक्षम करून सुधारित अग्निरोधक प्रणाली बसविण्यात आली आहे. कुठे आगीची घटना घडल्यास सायरन वाजल्याने त्या घटनेचे माहिती त्वरित मिळण्याची सोय उपलब्ध केली आहे.
प्रवेश नियंत्रणप्रणाली बसविणारे पहिले संकुल
सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही अशी यंत्रणा सर्वच संकुलांमध्ये असते. याबाबतीत ब्लॅक स्मिथच्या रहिवाशांनी त्यापलीकडे एक पाऊल टाकत कडी सुरक्षा ठेवली आहे. या ठिकाणी इमारतीमध्ये प्रवेश करताना प्रवेश नियंत्रण प्रणाली बसविण्यात आली आहे. संकुलातील प्रत्येक व्यक्ती आणि सुरक्षा रक्षक यांनाच स्वाइप कार्ड देण्यात आले आहे. आतमध्ये जाताना त्या कार्डने मशीनवर स्वाइप कार्ड ठेवल्यांनंतर संबंधित दरवाजातून आतमध्ये जात येते. यामुळे येथे कोणत्याही अनोळखी व्यक्तीला सहजासहजी आतमध्ये प्रवेश करण्याची मुभा नाही.
पूनम धनावडे