नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ३० जून रोजी संचालक मंडळाची सदस्य सभा आयोजित करण्यात आली होती, मात्र पणन संचालकांनी ही सभा रद्द करण्याचे आदेश दिले असून ही सभा घेण्यात आली नाही, त्यामुळे बाजार समितीतील मार्गी लागणाऱ्या विकास कामांना खो बसला असून धोरणात्मक निर्णय ही रेंगाळलेच आहेत.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजेश भुसारी यांनी ३० जूनला सदस्य समितीच्या सभेसाठी परिपत्रक काढले होते. या सभेमध्ये बाजार समितीची अत्यावश्यक कामांचे तसेच कर्मचारी भत्ता, सर्व्हिस रस्ता डांबरीकरण, कार्यालय, गाळे कॅन्टीन भाडेपट्टा करार, मालमत्ता विभाग, प्रशासन विभाग या विकास कामांची १६ विषय ठेवण्यात आली होते . सदर सभा सभापती अशोक डक यांच्या अध्यक्षतेखाली होणार होती. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील ७ सदस्यांना पणन संचालकांनी अपात्र ठरवले होते.
मात्र न्यायालयाने या आदेशाला स्थगिती दिल्याने संचालक मंडळ सभेसाठी आवश्यक सदस्यांची गणपूर्ती पुर्ण होत आहे. त्यामुळे ३० जून रोजी बाजार समिती सचिवांनी सदस्य सभा घेण्याबाबत परिपत्रक काढले होते .परंतु पणन संचालक यांनी संचालक मंडळातील सभापती व उपसभापती यांनी डिसेंबर २०२२ मध्ये राजीनामे दिले असून ते मंजूर करण्यात आले आहेत. सध्याच्या संचालक मंडळातील सदस्यांचे सदस्यत्व अपात्रते प्रकरणी न्यायप्रविष्ठ आहेत, त्यामुळे हि सभा रद्द करण्यात यावी असे आदेश देण्यात आले होते.