नवी मुंबई – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भव्य उद्घाटन बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असून, या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळ परिसरात आर्थिक हालचालींना मोठी चालना मिळाली आहे. पंतप्रधान मोदी यांचे विमान उद्घाटनावेळी विमानतळाच्या धावपट्टीवर उतरल्यानंतर त्यांनी विमानतळ प्रकल्पाचा आढावा घेत, टर्मिनल-१ इमारतीतील आधुनिक सुविधा आणि नव्या व्यावसायिक केंद्रांचे निरीक्षण करणार आहेत.

विमानतळाच्या टर्मिनल-१ मध्ये प्रवाशांसाठी अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ब्रॅण्डेड दुकानांनी आपली दारे उघडली आहेत. यामध्ये गुल्ली किचन, कोकार्ट अॅण्ड कॅफे, सबवे, टी टपरी, मुंबई स्ट्रीट, अदानी फाऊंडेशन, राडो स्वित्झर्लंड, आणि गार्डियन फार्मसी यांसारख्या लोकप्रिय ब्रॅण्ड्सचा समावेश आहे. पुढील काही महिन्यांत अजून अनेक नामांकित कंपन्या आणि भारतीय उद्योजक आपल्या आऊटलेट्स येथे सुरू करणार असल्याची माहिती सिडकोच्या सूत्रांनी दिली.

सध्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरही अशाच स्वरूपातील ब्रॅण्डेड दुकानांमधून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असून, ती अर्थव्यवस्थेला बळकटी देते. त्याच धर्तीवर नवी मुंबई विमानतळात सुरू झालेल्या या दुकानांमधून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार असून, शहरातील व्यापाराला नवसंजीवनी मिळेल. विमानतळाचा विस्तार आणि प्रवाशांची वाढती संख्या पाहता, येथील खाद्यपदार्थ, घड्याळे, आरोग्यविषयक वस्तू, आणि स्मृतीचिन्हांच्या विक्रीतून स्थानिक अर्थकारणाला स्थिर वाढ मिळणार आहे.

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सांगितले की, विमानतळाच्या पहिल्या टप्प्यासाठी सुमारे १९,६४७ कोटी रुपये खर्च झाले आहेत, तर संपूर्ण प्रकल्प पूर्ण होईपर्यंत एकूण खर्च एक लाख कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. यामुळे केवळ पायाभूत विकास नव्हे, तर विमानतळाच्या पहिला टप्पा सुरू झाल्यावर किमान १५ हजार रोजगार थेट निर्माण होणार असल्याचे व्यवस्थापकीय संचालक सिंघल यांनी सांगितले. तसेच पर्यटन आणि स्थानिक उद्योगांना दीर्घकालीन फायदा सुद्धा यामधून होणार आहे.

सिडको मंडळाने या सा-या आर्थिक परिवर्तनाचा वेग ध्यानात घेऊन उलवे येथील सेक्टर १२ मध्ये १९५ कोटी रुपये खर्चून युनिटी मॉल उभारण्याचा निर्णय घेतला. हा “युनिटी मॉल” परदेशी व देशांतर्गत प्रवाशांसाठी आकर्षणकेंद्र ठरणार आहे. येथे स्वदेशी उत्पादने आणि प्रत्येक राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती उपलब्ध असतील. त्यामुळे “मेक इन इंडिया” आणि “आत्मनिर्भर भारत” या संकल्पनांना मूर्त रूप मिळून नवी मुंबईला नव्या आर्थिक उंचीवर नेण्याचा मार्ग मोकळा होईल.