टोळी सक्रिय; पनवेलमध्ये चोरी करणाऱ्या दोघांना अटक

संतोष सावंत, पनवेल</strong>

भारतीय जनता पक्षाचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख यांच्या घरी झालेल्या चोरीची उकल करण्यात पनवेल पोलिसांना यश आले आहे. याच इमारतीच्या रखवालदारांच्या साथीदारांनीच ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर २००८ पासून मुंबई, नवी मुंबई ठाणे येथे विविध पोलीस ठाण्यात अकरा चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

नेपाळी चौकीदारांच्या चोरटय़ा टोळीने चौकीदार नावामधील प्रामाणिकपणावर काळिमा फासला आहे. पनवेल शहर पोलिसांनी दिवसरात्र एक करून या चोरीचा मुद्देमाल मिळविण्यासाठी प्रयत्न केला. मात्र अटक केलेल्यांची गुन्हेगारी पाश्र्वभूमी पाहता रखवालदारांपासून नागरिकांना सावधान म्हणण्याची वेळ आली आहे.

३ एप्रिल रोजी वाय. टी. देशमुख राहत असलेल्या सोसायटीत चोरी झाली. देशमुख यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याने त्यांचे कुटुंबीय गावी गेले होते. त्यामुळे चोरटय़ांना घरात शिरण्यास वाव मिळाला. अनेक दिवस या प्रकरणाचा तपास करणारे पनवेल शहर पोलीस हे घरात शिरण्यासाठी मुख्य दरवाजा चोरटय़ांनी बनावट किल्लीचा वापर केल्याचा अंदाज लावला जात होता. परंतु तसे नव्हते.

पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फूटेजचा पुसटसा काही भाग होता. त्यासोबत इमारतीचा रखवालदार याचे चोरी झाल्यादिवसापासून नसणे संशयास्पद होते. यामुळे पोलिसांचा पहिल्या दिवसापासून संशय रखवालदारावर होता. रखवालदारांच्या शोधात असणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, साहाय्यक निरीक्षक सुनील तारमळे यांच्या तपास पथकाला दोन रखवालदार सुरत गुजरात येथे लपून बसल्याची माहिती मिळाली. उपेंद्र प्रदीप साही (वय ३९), उपेंद्र बिरु साही (वय ३५) या दोनही संशयितांना ताब्यात घेतल्यावर त्यांनी दिलेली माहिती धक्कादायक होती.

हे दोघेही मूळ नेपाळचे राहणारे. वाय. टी. देशमुख यांच्या घरात चोरी करण्याचा बेत त्याच इमारतीच्या रखवालदाराचा होता. एकूण चौघांनी मिळून ही चोरी केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. देशमुख यांचा सुरुवातीला काही वर्षे घरातील सर्व कामे करून विश्वास संपादन करायचा त्यानंतर घरातील संपत्ती पाहून घरातील सर्व व्यक्तींचा कानोसा घेऊनच चोरी करण्याचे अनेक महिने अगोदरच ठरले होते.

नेपाळ हा आपला मित्र देश असल्याने तेथून आपल्या राज्यात कामासाठी येण्यासाठी कोणतेही पारपत्र लागत नाहीत. इतर चोरटय़ांप्रमाणे नेपाळी प्रांतातील देशमुखांच्या घरी चोरी करणारे हे चोर चोरीच्या मुद्देमालाचे वाटप करण्यासाठी लवकर एकमेकांना भेटत नाहीत. तसेच चोरीच्या घटनेनंतर स्वत:जवळील मोबाइल फोन प्रकरण थंड होईपर्यंत अनेक महिने बंद ठेवतात. तसेच चारही चोर चारही विरुद्ध दिशेला काही काळ दुसऱ्या ठिकाणी पुन्हा रखवालदाराचे काम पकडतात. ज्यांच्या घरी जास्त संपत्ती अशांना ही मंडळी लक्ष्य करतात. देशमुख यांचेही नेमके असेच झाले.

देशमुख यांचा नातू हासुद्धा रखवालदाराकडे सांभाळण्यासाठी होता एवढा विश्वास संबंधित रखवालदाराने संपादन केला होता. घरात थेट प्रवेश, घरातील कामे तसेच घरातील प्रवेशाचे सर्व रस्ते या रखवालदारास माहिती पडत गेले.

पोलिसांनी अटक केलेल्या चोरटय़ांकडे देशमुख यांच्या घरातील चोरीवेळी वापरलेल्या बनावट किल्लीबद्दल विचारणा केल्यावर त्यांनी देशमुख यांच्या घरात खिडकीने प्रवेश केल्याचे सांगितले.

देशमुख यांच्या रखवालदाराने ही खिडकी खुली असल्याची चोरीपूर्वी टेहळणी करून ठेवले होते. घरात शिरल्यावर थेट चोरांनी लॉकर तोडले. हे लॉकर काही दिवसांपूर्वीच देशमुख यांनी खरेदी करून घरी आणले होते. विशेष म्हणजे हे लॉकर देशमुख यांच्या घरी स्वत: चोरी करणारा रखवालदार घेऊन गेला होता. त्यामुळे त्याला घरात मोठे घबाड आल्याचे चुणूक लागली होती.

देशमुख यांच्या सोसायटीतील चोरीतील संशयित दोनही आरोपींना न्यायालयीन कोठडी मंजूर झाली असून ते दोघेही जामिनावर मुक्त आहेत.

सदनिकाधारकांच्या गळ्यातील ताईत

एक रखवालदार तीन ते चार वर्षे गृहनिर्माण सोसायटीमध्ये विश्वास संपादन करतो. कोणत्या सदनिकाधारकाकडे किती संपत्ती आहे याची माहिती याच दरम्यान घेतली जाते. सोसायटीमधील कचरा स्वच्छ करणे, पाणी टाकीत चढविणे, सोसायटीमधील गाडय़ा कमी रुपयांत धुणे, प्रवेशव्दार उघडणे-बंद करणे ही सर्व कामे हा रखवालदार एकाच व कमी वेतनात करत असल्याने तो मुंबई, पनवेल, ठाणे, नवी मुंबईतील अनेक सोसायटय़ांच्या सदनिकाधारकांच्या गळ्यातील ताईत झाला आहे. विशेष म्हणजे या नेपाळी रखवालदारांकडे भारतीय आधारकार्ड सापडले आहे. ही चिंतेची बाब पनवेल शहर पोलिसांनी व्यक्त केली आहे.

नोंदणीकृत रखवालदार घ्या!

काही रुपये रखवालदाराच्या वेतनावरील बचतीसाठी सोसायटय़ा नोंदणीकृत कंपन्यांकडून रखवालदार घेणे टाळतात. एक रखवालदार गावी जाण्याचा बहाणा करून सोसायटीची संपूर्ण टेहळणी करून जातो आणि त्यानंतर येणाऱ्या रखवालदाराची अपूर्ण माहिती असलेल्या वेळी संपूर्ण चोरीच्या घटनेला घडविले जाते. त्यामुळे कोणताही पुरावा सदनिकाधारकांच्या हाती राहत नाही. पनवेल शहर पोलिसांनी देशमुख यांच्या घरातील चोरीच्या प्रकरणानंतर रखवालदार ठेवताना त्याची माहिती असलेल्या नोंदणीकृत संस्थेकडूनच त्याला कामावर ठेवण्याचे आवाहन सामान्यांना केले आहे.