नगरसेवक ममित चौगुले यांच्या लग्नासाठी झगमगाट; जेवणावळी-सजावटीवर वारेमाप खर्च

नोटाबंदीमुळे अनेकांच्या विवाहांत अडथळे येत असताना राजकीय नेत्यांच्या कुटुंबातील विवाहांमध्ये मात्र पूर्णपणे वेगळे चित्र दिसत आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्यात वारेमाप खर्च झाल्यानंतर नवी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांचा नगरसेवक पुत्र ममित चौगुले यांच्या लग्नातही त्याचीच पुनरावृत्ती झाल्याचे दिसून आले. ऐरोली येथे झालेल्या या सोहळ्यासाठी लग्नमंडपाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर रोषणाई करण्यात आली होती. सजावट व जेवणावळीवर कोटय़वधी रुपये खर्च करण्यात आले. नवी मुंबई परिसरात असे शाही लग्न प्रथमच झाल्याची चर्चा होती.

[jwplayer PuSvtqP8]

केंद्र सरकारने आठ नोव्हेंबरला पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातली. तेव्हापासून आजवर सर्व आर्थिक व्यवहारांत प्रचंड गोंधळ उडाले आहेत. याच पाश्र्वभूमीवर एकनाथ शिंदे व विजय चौगुले यांच्या घरातील लग्नांची चांगलीच चर्चा रंगली आहे. शिंदे आणि चौगुले हे दोघेही साताऱ्याचे मूळ रहिवासी आहेत. रिक्षाचालक ते शिवसेना नेते अशा जीवनप्रवासात या दोघांकडे आजच्या घडीला असलेल्या अमाप संपत्तीचे प्रदर्शन त्यांच्या चिरंजीवांच्या लग्नानिमित्ताने मांडण्यात आले. वडारी समाजाचे राज्य पातळीवर नेतृत्व करणारे चौगुले यांचा ज्येष्ठ मुलगा ममित याचे तुर्भे येथील रेश्मा पाटील या आगरी समाजातील मुलीशी लग्न झाले.

या लग्नासाठी ऐरोली सेक्टर १० मधील सिडकोचा डिप्लोमॅटिक एन्क्लेव्हसाठी राखीव असलेला सुमारे पाच एकरांचा भूखंड घेण्यात आला होता. त्यावर उभारण्यात आलेल्या लग्नमंडपाचे काम गेले १० दिवस सुरू होते. लग्नमंडपाच्या मागील बाजूस वातानुकूलित व्हीआयपी व व्हीव्हीआयपी भोजनकक्ष उभारण्यात आले होते. सभामंडपाच्या उजव्या बाजूस भोजनाची व्यवस्था होती. कपडे बदल्यासाठी या कक्षांच्या जवळ व्हॅनिटी व्हॅन ठेवण्यात आली होती. या लग्नमंडपाकडे येणाऱ्या तीन मार्गावरील झाडांवर दिवाळीसारखी रोषणाई करण्यात आली होती.

लग्नाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापासून पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यापर्यंत अनेकांनी उपस्थिती लावली. साताऱ्यातील वऱ्हाडीही मोठय़ा संख्येने आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या लग्नाला आमंत्रित करण्यात आले होते, पण त्यांना अकोल्याला जावे लागल्याने ते येऊ शकले नसल्याचे समजते. लग्नमंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ तसेच मार्गावर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या स्वागताचे फलक लावल्याने हा लग्नसोहळा आहे की शिवसेनेची जाहीर सभा असा प्रश्न रहिवाशांना पडला होता.

लग्नाची तयारी एक महिन्यापासून सुरू होती. त्यामुळे नोटाबंदीचा निर्णय होण्यापूर्वीच सजावट आणि कॅटर्सचे पैसे धनादेशाद्वारे देण्यात आले होते. त्यात लग्नामंडपासाठी आमच्या नवरोत्रौत्सवातील जुने साहित्य वापण्यात आले. त्यात काही बदल करावा लागला. कॅटरर हा आमचा ‘इन हाऊस कॅटरर’ असल्याने त्याचा जास्त खर्च झाला नाही. नातेवाईकांकडून उधार घेऊन व काही उधारी अद्याप कायम ठेवून हे लग्न उत्साहात करण्यात आले आहे.

विजय चौगुले, विरोधी पक्षनेता, नवी मुंबई पालिका

[jwplayer y8Pn2zMM]