नवी मुंबई : महाराष्ट्र शासनाने सीसीएमपी (CCMP) अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांची स्वतंत्र नोंदणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये करण्याचा घेतलेला निर्णय डॉक्टरांमध्ये तीव्र असंतोष निर्माण करणारा ठरला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) आवाहनानुसार आज, गुरुवारी (१८ सप्टेंबर) राज्यभरातील डॉक्टरांनी २४ तासांचा टोकन संप पुकारला आहे. सकाळी ८ वाजता सुरू झालेला संप उद्या १९ सप्टेंबर सकाळी ८ वाजेपर्यंत चालणार असून नवी मुंबईत रुग्णालयांतील आपत्कालीन सेवा, बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) आणि खासगी दवाखाने बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे आज सकाळपासूनच रुग्णांना मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
शासनाचा निर्णय वादग्रस्त का?
वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागाने ५ सप्टेंबर रोजी परिपत्रक काढून सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांची स्वतंत्र नोंदणी करण्याचे निर्देश दिले. हे डॉक्टर आधीच महाराष्ट्र होमिओपॅथिक कौन्सिलमध्ये नोंदणीकृत आहेत. त्यामुळे स्वतंत्र नोंदणीची गरज नसल्याचे मत आयएमएने मांडले आहे. यापूर्वी ११ जुलै २०२४ रोजी शासनाने याच विषयावर विरोधी भूमिका घेतली होती. शिवाय सध्या हा मुद्दा माननीय मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असताना शासनाने घेतलेला निर्णय कायद्याला धरून नसून न्यायालयाचा अवमान करणारा आहे, असा आरोप आयएमएने केला आहे.
डॉक्टरांची चिंता
आयएमएच्या पदाधिकाऱ्यांच्या मते, “अपुरे प्रशिक्षण घेतलेले डॉक्टर रुग्णांवर उपचार करणे म्हणजे थेट जीवाशी खेळण्यासारखे आहे. आधुनिक वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा घसरवणारा आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC) व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल कायद्याचे उल्लंघन करणारा हा निर्णय तातडीने मागे घेतला पाहिजे.” असे आयएमएच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
नवी मुंबईतील परिस्थिती
संपामुळे नवी मुंबईतील खासगी रुग्णालयांमधील बहुसंख्य ओपीडी बंद आहेत. आपत्कालीन सेवा केवळ अतीआवश्यक परिस्थितीत चालवण्यात आल्या आहेत. अनेक रुग्णांना उपचारांसाठी शासकीय रुग्णालयांचा पर्याय निवडावा लागतो आहे. त्यामुळे शहरातील काही रुग्णालयांबाहेर सकाळपासून गोंधळाची परिस्थिती दिसून येत आहे.
आयएमए नवी मुंबई शाखेच्या वतीने आज संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ऍम्फीथिएटर येथे निदर्शने होणार आहेत. “हा लढा रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी आणि वैद्यकीय व्यवसायाच्या सन्मानासाठी आहे. शासनाने परिपत्रक मागे घेतले नाही तर पुढील आठवड्यात मुंबईतील आझाद मैदानावर भव्य मोर्चा आणि बेमुदत उपोषण होईल,” असा इशारा आयएमएच्या नेत्यांनी दिला आहे.