या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील वर्षांच्या तुलनेत यंदा २० टक्क्यांची घट

उरण तालुक्यातील चिरनेरसह इतर गावांतही आंब्याचे पीक घेतले जाते. यामध्ये दुबईत निर्यात होणाऱ्या हापूस आंब्याचा समावेश असून या वर्षीच्या पहिल्या हंगामातील आंबे तयार झाले आहेत. त्यामुळे रायगड व कोकणातील इतर तालुक्यांप्रमाणेच उरणमधील आंबा उत्पादक हाती आलेल्या पिकांच्या विक्रीसाठी सज्ज आहेत. पण सध्याच्या वातावरणातील बदलांचा परिणाम या पिकांवरही होत असल्याने यंदा आंबा विक्रीत २० टक्क्यांपेक्षा अधिकची घट होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

हापूसचा आंबा आणि कोकण हे समीकरण कायम असले तरी कोकणात मोडणाऱ्या रायगड जिल्ह्य़ातील हापूस आंबा तसा प्रसिद्ध नाही. मात्र काही वर्षांपासून रायगडमधील अलिबागमध्ये रायगडच्या हापूसलाही ओळख देण्याचा प्रयत्न आंबा उत्पादकांकडून होत आहे. यासाठी उरणचा दुर्गम भाग असलेल्या रानसई परिसरात आंब्याची लागवड केली जात असून यातील या आंब्याची आखाती देशात निर्यात केली जाणार आहे. त्याचबरोबर चिरनेर, कळंबुसरे, दिघोडे, वेश्वी, कोप्रोली, सारडे, वशेणी, केगाव, नागाव, चाणजे, शेवा आदी गावांतील शेतकऱ्यांनीही आंब्याची लागवड करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे यंदा उरण तालुक्यात एकूण १६५ हेक्टरी जमिनीवर आंबा लागवड झाली आहे. यात दरवर्षी १५ ते २० हेक्टर क्षेत्राची वाढ होत आहे. यासाठी कृषी विभागाकडूनदेखील विशेष प्रयत्न करताना आंबा पिकावरील कीड तसेच इतर रोगांसंदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधताना व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून मार्गदर्शनदेखील केले जात आहे.

मागील अनेक दिवसांपासून रात्रीचे थंड वातावरण, पडणारे दव व ढगाळ वातावरणाचा परिणाम आंबा पिकावर होऊ लागला आहे. त्यामुळे या वर्षीच्या आंबा उत्पादनात उरण तालुक्यात वीस टक्क्यांपेक्षा अधिकची घट होण्याची शक्यता आहे.

के.एस.वेसावे, कृषी अधिकारी, उरण.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Changing environments effect on production of mangoes in uran
First published on: 02-05-2017 at 01:20 IST