पनवेल : पेण येथील १६ वर्षांच्या मुलीचा बालविवाह पालकांनी लावून दिल्यानंतर तीला सासरी पनवेल तालुक्यातील पोयंजेवाडी गावात पाठविण्यात आले. सात ते आठ महिन्यांची गरोदर मुलगी गरोदरपणासाठी पेण येथील आईवडीलांच्या घरी आली. पेण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना या मुलीच्या वयाविषयी संशय आल्याने त्यांनी मुलीच्या आधारकार्डावरून वयाची चौकशी केल्यानतंर बालविवाहाच्या प्रकरणाला वाचा फुटली. अखेर या प्रकरणी मुलीच्या पतीवर अत्याचार केल्याचा गुन्हा पनवेल तालुका पोलीस ठाण्यात बुधवारी नोंदविण्यात आला. रायगड जिल्हाधिकारी प्रशासनाने आदिवासी वाड्यांवर सुरू असलेले बालविवाह रोखण्यासाठी प्रभावी जनजागृती करण्याची गरज असल्याची मागणी केली जात आहे.
रायगड जिल्ह्यात आजही आदिवासी समाजामध्ये अल्पवयीन मुलींचा बालविवाह वाड्यावस्तींवर करुन दिले जातात. विवाह वयापूर्वी करा पण कुटूंब नियोजनाचे नियम पाळा अशी शिकवण देऊन दोन्ही गटाच्या पालकांकडून बाल वधू वराला सावध केले जाते. गेल्या वर्षी १५ जुलै ते २३ नोव्हेंबर या दरम्यान पेण येथील पिडीतेचा विवाह पनवेल तालुक्यातील पोयंजे वाडीत २१ वर्षीय तरुणासोबत करुन देण्यात आला. या मुलीचे वय कमी असल्याचे माहिती असूनही तीच्यासोबत त्याने शरीरसंबंध ठेवले. मात्र ती गरोदर राहील्यावर प्रथेप्रमाणे तीला माहेरी पेण येथील पाठविण्यात आले.
पेण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडे तीला उपचारासाठी घेऊन गेल्यावर डॉक्टरांच्या तपासणीमध्ये ती गरोदर असल्याचे उजेडात आले. तेथील डॉक्टरांना अल्पवयीन असल्याचा संशय आल्याने त्यांनी पिडितेचे आधारकार्ड व इतर कागदपत्रावरून तीच्या वयाची माहिती घेतली. त्यानंतर या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून पुढील तपासासाठी हा गुन्हा पनवेल तालुका पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. सध्या वरिष्ठ पोलीस निरिक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक गौरव इंगोले हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. अल्पवयीन मुलगी हे माहिती असताना सुद्धा पतीने तीच्यावर अत्याचार केल्याची तक्रार संबंधित पिडीताने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. सध्या पीडितेच्या पोटात सात महिन्याचा गर्भ आहे.
सरकारी डॉक्टरांनी यापूर्वी कळंबोली आणि खांदेश्वरमध्ये अशा पद्धतीचे दोन बालविवाह उघडकीस आणले आहेत. २०२३ आणि २०२४ या दोन वर्षात दोन मुलींच्या गरोदरपणात ही बाब उघडकीस आली. दोन्ही प्रकरणी कळंबोली आणि खांदेश्वर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे हे गुन्हे उघडकीस होतात. मात्र हे गुन्हे रोखण्यासाठी जनजागृतीची गरज आहे.