कोपरखैरणे सेक्टर ३ येथून सुरुवात, पालिकेवर चालढकलपणाचा आरोप

नवी मुंबई पालिका क्षेत्रातील सिडको भूखंडावरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यास कोपरखैरणे सेक्टर ३ येथून सिडकोने पुन्हा सुरुवात केली आहे. गेले काही दिवस सिडकोकडून दक्षिण नवी मुंबईतील अतिक्रमणांवर कारवाई सुरू असल्याने पालिका क्षेत्रातील कारवाईकडे त्यांचा कानाडोळा होता. मात्र सिडकोच्या भूखंडावर होणारे अतिक्रमण हटविण्यात पालिका चालढकलपणा करत असल्याने सिडकोने एकटय़ाने ही कारवाई हाती घेतली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने नवी मुंबईतील अतिक्रमणावर सिडको व पालिकेला संयुक्तपणे कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र नवी मुंबईतील सर्व जमीन सिडकोची असल्याने पालिका अतिक्रमणांवर कारवाई करण्यात विशेष पुढाकार घेत नसल्याचे दिसून येत होते. सिडकोने पालिकेला काही भूखंड हस्तांतरित केलेले आहेत. त्यावर अतिक्रमण किंवा बेकायदेशीर बांधकामे झाल्यास पालिका कारवाई करीत होती. मात्र सिडकोच्या भूखंडावरील बेकायदेशीर बांधकामांकडे पालिकेने कानाडोळा केल्याने शहरात मोठय़ा प्रमाणात बेकायदेशीर बांधकामे फोफावली आहेत. पालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील सर्व बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्याची तयारी दर्शवली होती. त्यानुसार त्यांनी बेधडक कारवाई सुरू केली होती. त्यामुळे सिडकोचा अतिक्रमण विरोधी विभाग निश्चित झाला होता. मुंबई उच्च न्यायालयानेही दिघा येथील बेकायदेशीर बांधकामांच्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना पालिकेने शहरातील सर्व बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करणे अपेक्षित असल्याचे स्पष्ट केले होते. त्याला सिडको व एमआयडीसीने सहकार्य करावे, असे आदेश दिले होते. मात्र मागील काही दिवसांपासून पालिका आपल्या क्षेत्रातील सिडको भूखंडावरील कारवाई होत नसल्यामुळे अखेर सिडकोनेच मागील चार दिवसांपासून आपल्या भूखंडावर होणारे अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली आहे.

विकलेल्या भूखंडावरील अतिक्रमण हटवणार

कोपरखैरणे सेक्टर तीनमधील भूखंड क्रमांक १७ वर बांधकाम साहित्य टाकून तो हडप करण्याच्या हालचाली सुरू होत्या. एका ट्रॅव्हल्स कंपनीने या ठिकाणी बेकायदेशीर कार्यालय उभारले होते. ते सिडकोने शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात हटविले. यात गावातील डिसेंबर २०१५ पूर्वीच्या बांधकामांवर कारवाई होणार नाही, असेदेखील स्पष्ट करण्यात आले. मात्र विकलेल्या भूखंडावरील बेकायदेशीर बांधकाम हटविले जाईल, असे सिडकोने स्पष्ट केले आहे. कोपरखैरणेनंतर ही कारवाई वाशी, नेरुळ आणि ऐरोली भागात होणार आहे.