कागदपत्रात त्रुटी, कमतरता असल्याने लाभार्थी अपात्र; किमती कमी करण्याचा विचार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई : सिडकोला महागृहनिर्मितीतील सहा हजार घरांची विक्री न झाल्याने घरांची संख्या आणि किमंती कमी करण्याचा निर्णय घ्यावा लागणार असल्याची चर्चा आहे. दोन वर्षांपासून सिडकोने जवळपास २४ हजार घरांची सोडत काढली असून यातील सहा हजार घरे विक्री विना शिल्लक राहिलेली असल्याची बाब समोर आली आहे.

ऑक्टोबर २०१८ रोजी १४ हजार ७३८ तर ऑक्टोबर २०१९ मध्ये ९ हजार ४६६ घरांची सोडत काढण्यात आली आहे. या घरांसाठी सिडकोकडे लाखो ग्राहकांचे मागणी अर्ज आलेले आहेत. मात्र नंतर लाभार्थी ग्राहकांनी सादर केलेल्या कागदपत्रात अनेक त्रुटी, कमकरता आढळून आल्याने हे अर्ज अपात्र ठरलेले आहेत. यात जातीची प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, आरक्षित क्षेत्र, आणि हप्ते भरण्यात आलेली अडचण या कारणांचा समावेश आहे. मोठ्या उमेदीन घेतलेल्या मागणी अर्ज केल्यानंतर भाग्यवंत ठरलेल्या अनेक ग्राहकांना सिडकोचे घर घेताना संकटांचा सामना करावा लागला आहे.

करोना काळात तर रोजगार व वेतन कपातीमुळे तसेच करोना उपचारासाठी अनेकांनी सिडकोच्या घरांवर पाणी सोडण्याची तयारी दर्शवली आहे. ही संख्या आता सहा हजाराच्या घरात गेली आहे. त्यामुळे सुमारे २४ हजार घरामध्ये सहा हजार घरे विक्री विना शिल्लक राहात असल्याने सिडकोने या घरांच्या किमंती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी घरांच्या रचनेत बदल करुन होणारा बांधकाम खर्च कमी केला जाणार आहे.

याशिवाय महामुंबई क्षेत्रात मोठ्या प्रमाणात तयार होणाऱ्या परवडणाऱ्या घरांच्या साठ्याचा अभ्यास सिडकोचा अर्थ विभाग करणार आहे. सिडको मुख्यालयातील हस्तींदंत मनोऱ्यात बसून आतापर्यंत विद्यमान बाजारभावांचा अभ्यास करुन सिडकोचा अर्थविभाग घरे तसेच गाळ्यांच्या किमंती ठरवत असल्याने वास्तूस्थितीचा विसर पडत असल्याची चर्चा सिडको वर्तूळात आहे. त्यामुळे महामुंबई क्षेत्रात विक्री विना शिल्लक असलेली घरे बदलते बांधकामाचे आयाम याचा अभ्यास करुन वस्तूनिष्ट किंमत ठरविण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

स्वस्त दरात घरांची स्पर्धा?

उरण येथील द्रोणागिरी व उलवा भागात देशातील मोठे उद्योगपती वाणिज्य व निवासी घरांचे बांधकाम करणार होते. त्यासाठी जमिनीचे मोठ्या प्रमाणात सपाटीकरण सुरू आहे. हा प्रकल्प त्यांना आता आपले बांधकाम व्यवसायिक स्नेही यांना हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू केली असून ते स्वस्त दरातील घरे बांधणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे महामुंबई क्षेत्रात येत्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात घरांचा साठा तयार होणार असल्याने सिडकोला घरांच्या किमती कमी करण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक नसल्याचे दिसून येते. यामुळे घर निर्मितीच्या या स्पर्धेत ग्राहकांना स्वस्त दरात घरे मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cidco house document verification six thousand homes left unsold akp
First published on: 23-10-2020 at 00:57 IST