नवी मुंबई : सिडकोच्या इतिहासात पहिल्यांदाच नेरुळ येथील पाच हजार चौरस मीटरच्या भूखंडाला ३८२ कोटी रुपयांचा दर इ – लिलाव पद्धतीने बोलीधारकांकडून लावण्यात आला आहे. प्रति चौरस मीटरला तब्बल ७ लाख ६५ हजार रुपयांचा दर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी सर्वाधिक दर ६ लाख ४५ हजार रुपयांचा आला होता. नेरुळ येथील सेक्टर २८ मधील भूखंड क्रमांक १२-सी या भूखंडाला मिळालेल्या या विक्रमी दरासोबत विविध भूखंड विक्रीतून इ – लिलावात १८ भूखंड विक्रीतून सिडकोच्या तिजोरीत तब्बल २,०३६ कोटी रुपये जमा होणार आहेत. विशेष म्हणजे संबंधित भूखंडाचा सिडकोने जाहीर केलेला मूळ दर हा ३ लाख २६ हजार रुपये प्रति चौरस मीटर होता. संबंधित भूखंडांची बोली दुपटीने लागल्याने सिडकोला यापुढे मूळ दरात कमालीची वाढ करण्याचा निर्णय सुद्धा घ्यावा लागणार असल्याची चर्चा आहे.
सिडकोच्या स्थापनेपासूनच्या पन्नास वर्षांच्या इतिहासात हा सर्वाधिक दर ठरला असून, एका लिलावातून इतकी मोठी रक्कम प्रथमच सिडकोला मिळाली आहे. सिडकोच्या पणन विभागामार्फत ऐरोली, घणसोली, खारघर, नेरुळ आणि सानपाडा येथील एकूण ४८ भूखंडांची भाडेपट्ट्यावर विक्री करण्यासाठी इ-लिलावाचे आयोजन करण्यात आले होते.
या इ लिलावपद्धतीमध्ये १५३ विकसकांनी अनामत रक्कम भरून लिलावामध्ये बोली लावण्याचा अधिकार मिळवला. खारघर येथील ११ हजार चौरस मीटरच्या भूखंडांसाठी एकच विकसक कंपनीने स्वारस्य दाखवले. मात्र तीनच्या वरती बोलीधारकांशिवाय लिलाव होऊ शकत नाही हे सूत्र असल्याने खारघरच्या या भूखंडांचा लिलाव यावेळी टळला. तसेच १९ ठिकाणी भूखंड लहान असल्याने बोलीधारकांनी या भूखंडांमध्ये कोणतेही स्वारस्य दाखवले नाही.
या लिलावात नेरुळ येथील ५,००६ चौरस मीटर भूखंडासाठी ३८२ कोटी ५० लाख रुपयांची सर्वोच्च बोली लागली. यामुळे नवी मुंबईमधील जमिनींच्या दरात प्रचंड वाढ झाली असून, या शहरातील भूखंड आता सोन्याच्या भावाला तुल्य ठरत आहेत.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर रिअल इस्टेटच्या व्यवसायातील तेजी अधिक ठळकपणे जाणवते. या लिलावामुळे नवी मुंबईतील रिअल इस्टेट बाजारात कमालीची उसळी आली असून, पुढील काळात घर खरेदी करणाऱ्यांसाठी किंमती वाढणार हे निश्चित झाले आहे.
या व्यवहारामुळे सिडकोच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार असून, भविष्यातील पायाभूत सुविधांसाठी निधी उभारण्यास ही रक्कम उपयुक्त ठरेल. राज्य सरकारच्या तिजोरीत निधीची चणचण असताना सिडकोच्या तिजोरीत भूखंड विक्रीतून होत असलेल्या भरभराटीमुळे राज्य सरकारच्या उत्पन्नामध्ये एकाप्रकारे मोलाची मदत होणार आहे.
व्यावसायीक वातावरणात सर्वाधिक विकसकांना या इ लिलावात सहभाग घेता यावा यासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या सूचनेनूसार संबंधित इ लिलाव योजनेला मुदतवाढ देण्यात आली. दिलेल्या मुदतवाढीमुळे सिडकोच्या इतिहासामध्ये आतापर्यंत सर्वाधिक चांगला दर नेरूळ येथील सेक्टर २८ येथील सिडकोला मिळाल्याचे पाहायला मिळाले.वेणू नायर, व्यवस्थापक, पणन विभाग, सिडको मंडळ