महामंडळातील नियुक्त्या मुंबई पालिका निवडणुकीनंतर
राज्यातील सर्वात मोठे श्रीमंत महामंडळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिडकोचे अध्यक्षपद मिळावे यासाठी दिल्लीत काही दिवस तळ ठोकून बसणाऱ्या राज्यातील भाजप नेत्यांना मुंबई महापालिकेनंतर सिडको, म्हाडा महामंडळाच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीचा विचार केला जाईल, असे भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने स्पष्ट केले आहे.
त्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीने मुंबई पालिकेची निवडणूक किती प्रतिष्ठेची केली आहे हे दिसून येत असून सर्व महामंडळांच्या नियुक्त्या तूर्त स्थगित केल्या आहेत.
आघाडी सरकारप्रमाणे भाजप सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळ नियुक्त्यांचा गोंधळ अद्याप सुरू आहे. त्यामुळे शिवसेना, भाजप पक्षाचे प्रमुख नेते, आमदार, कार्यकर्ते यांचा डोळा असलेल्या महामंडळांच्या नियुक्त्या न झाल्याने त्यांच्यातील अस्वस्थता वाढली आहे.
राज्यातील सिडको, म्हाडा, एमआयडीसी आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळ ही चार प्रमुख महामंडळे ओळखली जातात. त्यावरून शिवसेना, भाजपमध्ये जुंपली असून शिवसेनेला म्हाडा व सिडको ही दोन महत्त्वाची महामंडळे हवी आहेत.
भाजपतील नेते यातील एकही महामंडळ शिवसेनेला देण्यास तयार नाहीत. या चार महामंडळांपैकी प्रदूषण नियंत्रण महामंडळावर शिवसेनेची बोळवण केली जाणार आहे. हा तिढा सुटलेला नसताना भाजपतील महामंडळ इच्छुक नेत्यांनी नुकतीच भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्याचे समजते.
त्यावेळी भाजपच्या दृष्टीने मुंबई महापालिका निवडणूक राज्य निवडणुकी इतकीच महत्त्वाची असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
त्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, आरपीआय आणि कोळी महासंघ सारख्या बलाढय़ संस्थांना मुंबई पालिका निवडणुकीत भाजपच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आत्तापासून सांगितले जात असून, त्यांना या महामंडळाच्या अध्यक्षपदाचे गाजर दाखविण्यात आले आहे. त्यामुळे पदे मिळविण्यासाठी अनेकजण उत्सुक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सबुरीचा सल्ला
भाजपच्या कोणत्याही आमदाराला महामंडळ न देण्याचा निर्णय भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने घेतला असून, कार्यक्षम नेते व कार्यकत्यांची मुंबई पालिका निवडणुकीत कसोटी तपासून पाहिली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो, नैना, यासारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे सिडकोचे अध्यक्षपद मिळावे यासाठी अनेक जण प्रयत्नशील असताना त्यांना सबुरीचा सल्ला देण्यात आला आहे.