CIDCO Illegal Building Demolition: नवी मुंबई : पनवेल परिसरासह इतर शहरात मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. याच अनधिकृत बांधकामांवर सिडको प्रशासनाच्यावतीने जोरदार तोडक कारवाई सुरू केली आहे. यामध्ये ६५० अनधिकृत इमारतींवर जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत.

दिवाळी नंतर सिडकोच्यावतीने पुन्हा अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास सुरूवात झाली आहे. शुक्रवारी खारघर सेक्टर १३ येथील तळमजला अधिक तीन मजली इमारत जमीनदोस्त करण्यात आली. ही कारवाई सिडकोच्या दक्षता विभागाच्या पथकाकडून करण्यात आली. सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी व डीआयजी सुरेश मेंगडे यांनी माहिती देताना सांगितले की गेल्या वर्षभरात सिडकोने सुमारे ६०० ते ६५० अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली आहे. त्यामध्ये सुमारे ३५० वीट आणि कच्ची बांधकामे तसेच सुमारे ३०० पक्की बांधकामे तोडण्यात आली.

तसेच खारघरमधील इमारत ही साडेबारा टक्के प्रकल्पग्रस्तांसाठी राखीव असलेला भूखंड असून, पात्रता धारकांसाठी तो राखून ठेवण्यात आला आहे. मात्र, या ठिकाणी विनापरवानगी तळ अधिक तीन मजली इमारत उभारण्याची काम सुरू होते. या बांधकामांसंबंधित बांधकामधारकाला वेळोवेळी नोटीस बजावून बांधकाम थांबविण्याचे आदेश सिडकोच्यावतीने देण्यात आले होते. परंतु त्यांनी ते दुर्लक्षित केले. सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार सर्व प्रक्रिया पूर्ण करून या इमारतीवर कारवाई करण्यात आल्याचे मेंगडे यांनी सांगितले.

नागरिकांना आवाहन

खारघर परिसरात धोकादायक अवस्थेतील बांधकामे आहेत. जरासा धक्का लागल्यास त्यांची भिंत कोसळण्याइतकी अवस्था या बांधकामांची आहे. त्यामुळे सिडकोने या परिसरात मोठ्या प्रमाणात तोडक मोहीम सुरू केली आहे. तसेच वर्तमनापत्रात जाहिरातीमार्फत अनधिकृत बांधकामांसंबंधी सुचना करण्यात येतात. तसेच नागरिकांना देखील अनधिकृत बांधकामांमध्ये गुंतवणूक करू नका असे आवाहन केले जाते.

सिडकोकडून पोलिसांच्या मदतीने विविध गावठाण भागांमध्ये अनधिकृत बांधकाम विरोधी कारवाई सुरू आहे. एकदा तोडक कारवाई झाल्यानंतर पुन्हा अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर सिडकोच्यावीने गुन्हे दाखल करण्याची प्रक्रियाही केली जात आहे.