नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्धाटन होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळाच्या धावपट्टीवरुनच चौथ्या मुंबईच्या विकासाची संकल्पना नव्याने मांडण्याचा प्रयत्न केल्याने आगामी काळात पालघर जिल्हा हा राज्य सरकारसाठी विकासाचा केंद्रबिंदू ठरेल हे स्पष्ट झाले. नवी मुंबई विमानतळालगत तिसऱ्या मुंबईचा विकास लवकरच हाती घेतला जाणार आहे. हे करत असताना पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर आणि त्यालगतच नियोजीत असणाऱ्या विमानतळ प्रकल्पावर आगामी काळात राज्य सरकारचा भर असेल हे यानिमीत्ताने स्पष्ट झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर हा महत्वकांक्षी प्रकल्प मानला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होत असताना मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा संपूर्ण सुर हा पालघर जिल्ह्यातील बहुचर्चित प्रकल्पांच्या दिशेनेच असल्याचे पहायला मिळाले. लोकसभा निवडणुका तोंडावर असताना राज्य सरकारने मुंबई-न्हावाशेवा दरम्यान ‘अटल सेतू’ची उभारणी करुन तिसऱ्या मुंबईच्या विकासाची वेगाने आखणी करण्याचा संकल्प सोडला होता. तत्कालिन मुख्यमं६ी एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारित असणाऱ्या मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने ‘अटल सेतू’च्या शुभारंभानंतर तिसऱ्या मुंबईसाठी जमिन संपादनाचा वेगही वाढविला.
याच काळात राज्य सरकारने सिडकोच्या अखत्यारित असलेली काही गावे या बहुचर्चित तिसऱ्या मुंबईसाठी एमएमआरडीएकडे सोपवली. राज्य सरकारच्या या प्रकल्पाविषयी स्थानिक ग्रामस्थांमध्ये फारसे कुतुहूल दिसलेले नाही. किंबहुना या प्रकल्पासाठी होणारे जमीनीचे संपादन चुकीच्या पद्धतीने होत असल्याची ओरडच होताना दिसत आहे. असे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात तिसऱ्या मुंबईचा पुसटचा उल्लेख करत असताना आगामी प्रकल्पांचा भर मात्र चौथ्या मुंबईवर असल्याचे संकेत आपल्या भाषणात स्पष्टपणे दिले.
बंदर आणि कृत्रीम बेटावरील विमानतळ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात पुढील लक्ष्य पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर हेच असेल हे स्पष्ट केले. वाढवण बंदरास लागून देशातील पहिला देशातील पहिला ॲाफशोअर विमानतळ उभारला जाईल असेही ते म्हणाले. समुद्रातील कृत्रीम बेटावर हे विमानतळ असणार आहे. यामुळे मुंबई महानगर प्रदेशात तिसरे विमानतळ उभारण्याचे आमचे लक्ष्य आहे, असेही फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले. नवी मुंबई विमानतळालगत तिसरी मुंबई उभी रहात असताना वाढवण बंदर आणि तेथील विमानतळालगत चौथी मुंबई उभी करण्याचे सुतोवाच मुख्यमंत्र्यांनी केल्याने राज्य सरकारच्या विकासाची आगामी दिशा स्पष्ट झाली आहे.
वाढवण व जेएनपीए बंदरात भविष्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष एक कोटी रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असा दावा जेएनपीए बंदराचे अध्यक्ष व वाढवण बंदराचे मुख्य कार्यकारी अधिकारी उन्मेष शरद वाघ यांनी केला आहे. सद्या जेएनपीएने जगातिक सर्वोकृष्ट बंदरांमध्ये ९३ व्या क्रमांकावरून जागतिक पातळीवर २३ वर झेप घेतली आहे. या बंदराने राज्यालाआर्थिक पातळीवर महत्वाचे स्थान मिळवून दिले आहे. त्यामुळे पुढील शंभर वर्षात जेएनपीए आणि वाढवण मुळे देशाचे आर्थिक महत्व वाढेल, असा दावा वाघ यांनी केला.