नवी मुंबई : नवी मुंबईत सीएनजी गॅसचा पुरवठा रविवारी रात्रीपासून पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे पनवेल ते ऐरोलीपर्यंत सर्वच प्रमुख पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. गॅस भरण्यासाठी अनेक ऑटोरिक्षा, टॅक्सी तसेच खासगी सीएनजी वाहनधारक पंपांबाहेर तासंतास प्रतीक्षेत असल्याचे चित्र सकाळपासून पाहायला मिळते आहे.

महानगर गॅस लिमिटेड कडून मिळालेल्या माहितीनुसार, GAIL च्या मुख्य गॅस पाइपलाइनला चेंबूर-ट्रॉम्बे परिसरात नुकसान झाल्यामुळे गॅसचा पुरवठा ठप्प झाला आहे. वडाळा येथील ‘सिटी गेट स्टेशन’द्वारे नवी मुंबई-ठाण्यासह मुंबईतील सीएनजी पंपांना गॅस मिळतो. परंतु, पाइपलाइन तुटल्यामुळे हा पुरवठा ठप्प झाला असून महानगर गॅसने घरगुती वापरकर्त्यांना प्राधान्य देत सीएनजी वितरण तात्पुरते थांबवले आहे. दरम्यान, पाइपलाइन दुरुस्ती सुरू असून पुरवठा कधी सुरळीत होईल याबाबत अधिकृत वेळ अद्याप जाहीर केलेली नाही.

याचा परिणाम नवी मुंबईतील सीएनजी वाहनांवर झाला आहे. वाशी, नेरूळ, बेलापूर, घणसोली, ऐरोली, तुर्भे, पनवेल या भागांतील पंपांवर सकाळी ४ वाजल्यापासून वाहनांची गर्दी दिसून येत आहे. काही पंपांवर शेकडो वाहनं रांगेत उभी असून, सीएनजी गॅसची प्रतीक्षा करत आहेत. “काल रात्रीपासून गॅस मिळत नाहीये. दिवसभर गाडी चालवायची कशी?” असा सवाल रिक्षा चालकांकडून विचारला जात आहे. अनेक चालकांनी सीएनजी गॅस अभावी आजचा दिवस वाया गेल्याचे म्हटले आहे.

या पुरवठा बंदीमुळे नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूकही अडथळ्यात येण्याची चिन्हे आहेत. रिक्षा-टॅक्सी संघटनांच्या म्हणण्यानुसार, गॅस उपलब्ध न झाल्यास रिक्षा-टॅक्सी सेवा बाधित होऊ शकते. त्यामुळे वर्दळीच्या वेळेत प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच खासगी सीएनजी वाहनचालकांनाही पर्यायी इंधनाचा आधार घ्यावा लागतो आहे.

महानगर गॅसनेही औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना तात्पुरते पर्यायी इंधन वापरण्याचा सल्ला दिला आहे. मात्र सार्वजनिक वापरातील सीएनजी पुरवठा पुन्हा कधी सुरू होईल याबाबत अनिश्चितता कायम आहे.

सीएनजी पुरवठा ठप्प राहिल्याने शहराच्या दैनंदिन वाहतुकीवर आणि सुमारे हजारो वाहनचालकांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. पुरवठा सुरू होईपर्यंत पंपांवरील गडबड आणि प्रतीक्षा कायम राहण्याची शक्यता आहे.