नवी मुंबई : फक्त “मी मराठी बोलतो” असं सांगितल्यामुळे एका विद्यार्थ्यावर हॉकी स्टिकने थेट डोक्यावर हल्ला करण्यात आला आहे. वाशीतील एसआयईएस महाविद्यालयाबाहेर सोमवारी (२१ जुलै) घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे मराठी-अमराठी वादाचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी जखमी तरुणाच्या तक्रारीवरून तीन जणांविरोधात गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.
काय घडलं नेमकं?
पीडित सूरज पवार (वय २०, राह. पावणे गाव, ऐरोली) याने वाशी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, कॉलेजच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये त्याने “मी मराठी बोलतो” असं लिहिलं होतं. यावरून फैजान नाईक या विद्यार्थ्याने त्याची थट्टा केली. सूरजने याकडे दुर्लक्ष केलं, मात्र त्यानंतर फैजानने त्याला धमकी दिली.
दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहाच्या सुमारास सूरज कॉलेजला पोहोचताच कॉलेजच्या प्रवेशद्वारासमोरच्या फुटपाथवर फैजानने त्याला गाठले. त्याच्या हातात हॉकी स्टिक होती. त्याने सूरजच्या डोक्यावर आणि पाठीवर हॉकी स्टिकने जोरदार मारहाण केली. एवढंच नाही, तर फैजानसोबत आणखी दोन जण होते. तिघांनी मिळून सूरजला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि शिवीगाळ करत बघून घेण्याची धमकी दिली. या हल्ल्यात सूरज रक्तबंबाळ झाला. सध्या सुरजवर उपचार करण्यात आले असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याचे घरच्यांनी सांगितले. मात्र, याचा प्रचंड मानसिक आघात सुरजवर झाल्याचे त्याच्या घरच्यांकडून कळते आहे.
पोलीस कारवाई काय?
वाशी पोलिसांनी २० वर्षीय फैजान नाईक आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात गंभीर मारहाण, इजा करण्याच्या हेतूनेहल्ला करणे, शिवीगाळ आणि दमदाटी करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, कट रचून मारहाण करणे अशा पद्धतीचे गुन्हे दाखल केले आहेत. आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन चौकशीसाठी बोलावलं असून, उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे.
मनसेची पोलीस ठाण्यात धाव
या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. मनसेचे शहरप्रमुख गजानन काळे यांनी वाशी पोलिसांची भेट घेत, आरोपींची चौकशी करून त्यांच्यावर कायद्याची जरब बसेल अशी कारवाई करण्याची विनंती पोलिसांना केली. दरम्यान, आरोपी अमराठी मुलाने घडलेल्या प्रकाराबद्दल सर्वांसमोर मराठी मुलाची बिनशर्त माफी मागितली असल्याचे वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी सांगितले आहे.
यामुळे हे प्रकरण काहीसे निवळले असले तरी, राज्यात सुरू असलेला हिंदी-मराठी वाद महाविद्यालयांपर्यंत येऊन पोहोचल्याने पालक व सर्वसमान्यांकडून चिंता व्यक केली जात आहे.
“राज्यात हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सुरू असलेला हिंदी-मराठी वाद आणि त्यावरून सुरू असलेली उत्तर भारतीय नेत्यांची विधाने यामुळे हा वाद आता महाविद्यालयांपर्यंत येऊन पोहोचला आहे. याचा विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम होत आहे. याबद्दल राज्य सरकार आणि यंत्रणांनी विचार करावा. वाशीत झालेल्या हाणामारीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याला आमची प्राथमिकता राहील.
त्यामुळे आरोपींवर कायद्याची जरब बसेल अशा प्रकारे समज देण्यात यावी. अशी आमची मागणी आहे. तसेच इतर जर कोणी अशा प्रकारची मुजोरी करत असेल तर त्याला मनसे त्याला जशास तसे उत्तर देईल,” असा इशारा नवी मुंबईचे मनसे शहर प्रमुख गजानन काळे यांनी दिला आहे.