पनवेल – राज्य सरकारने गणेशोत्सवाला राज्य उत्सव असा दर्जा दिला असला तरी शहरातील अनेक रस्त्यांवर पडलेल्या खड्यांमधून गणरायाच्या मूर्ती आगमन कसे करावे, पनवेलमधील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही तरी करा, झाडांच्या फांद्यामुळे मूर्ती मिरवणूकांना त्रास होतो. सिडकोकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळवणे सर्वात कठीण प्रश्न, विसर्जन रस्त्यावर लोंबकळणा-या विजवाहिन्यांमुळे अपघात होऊ शकतो अशा विविध समस्या व प्रश्नांचा भडिमार पनवेल महापालिकेने मंगळवारी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या आढावा बैठकीत गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींनी केल्या. यावर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांनी निवेदन करताना यंदाचा गणेशोत्सव अपघात मुक्त साजरा करण्याचा संकल्प करूया असे आवाहन मंडळांच्या प्रतिनिधींना केले. पनवेल महापालिका क्षेत्रातील गणेशोत्सवामधील वाहतूकीची समस्येचे निवारण करण्यासाठी पोलीस दलाला शंभर वार्डन देण्याची तयारी पालिकेने या बैठकीत दर्शविली. सर्वात महत्वाचे म्हणजे न्यायालयाच्या निर्देशामुळे सहा फुटांच्या खालील सर्व गणेश मूर्ती कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित कराव्या लागतील, अशी महापालिकेची भूमिका या बैठकीत आयुक्त चितळे यांनी स्पष्ट केली.
गणेशोत्सवाला २२ दिवस शिल्लक असताना पनवेल महापालिका क्षेत्रातील विविध गणेशोत्सव मंडळांच्या अडचणी एेकुण घेण्यासाठी आणि महापालिकेची गणेशोत्सवासाठी आखलेली भूमिका स्पष्ट करण्यासाठी ही बैठक महापालिकेने आयोजित केली होती. या बैठकीमध्ये पालिका आयुक्त चितळे, सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले, पालिकेचे उपायुक्त कैलास गावडे, डॉ. वैभव विधाते, स्वरूप खारगे तसेच शहर अभियंता संजय कटेकर यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, राजेंद्र कोते, अजय कांबळे, अजय भोसले, संजय पाटील, दिलीप चव्हाण, विमल बिडवे, स्मिता ढाकणे व इतर सरकारी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये विविध गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींनी उत्सव साजरा करताना सरकारी विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असला तरी विजेवरील सवलत मुंबईच्या मंडळांनी दिली जाते तर पनवेलच्या गणेशोत्सव साजरा करणा-या मंडळांना का दिली जात नाही असा प्रश्न विचारला. तसेच महापालिकेने एक खिडकी योजनेतून परवानगी मिळविण्यासाठी जशी तांत्रिक सोय केली तशी सोय सिडको मंडळाकडून मिळत नसल्याने बैठकीत सिडकोच्या कारभाराविषयी संताप व्यक्त केला. राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकदा मंडळांना पाच वर्षांची परवानगी मिळण्याची पद्धत पनवेलमध्ये का लागू केली गेली नाही असा सुद्धा प्रश्न विचारण्यात आला. उरण नाका येथील करंजाडे नोडला जोडणारा पुल धोकादायक असून त्याशेजारी गणेश मूर्तीचे विसर्जनघाट असल्याने पुल नव्याने बांधण्याची सूचना करण्यात आली. फलक व इतर नियमांचे भूत मंडळांच्या मानगुटीवर बसविले जात असल्याकडे सुद्धा मंडळांच्या प्रतिनिधींनी लक्ष वेधले.
या सर्व तक्रारी व समस्यांवर भाष्य करताना आयुक्त चितळे यांनी अपघात मुक्त गणेशोत्सव साजरा करूया असे आवाहन करताना कृत्रिम तलावांची संख्या गेल्या वर्षी ५७ होती यंदा त्यापेक्षा अधिक व सहा फुट उंचीची मूर्ती बुडेल अशी करणार असल्याचे स्पष्ट केले. महापालिकेच्या संकेतस्थळावरून इ गर्व्हनसचा वापर मंडळांनी केल्यास एकाच ठिकाणी पालिकेची परवानगी मिळू शकेल असेही सांगीतले. सिडको मंडळासोबत समन्वय साधून मंडळांच्या परवानगीची यंत्रणा अधिक सुलभ करण्यासाठी सिडकोने अधिकारी नेमावा यासाठी पाठपुरावा करू असेही आयुक्त म्हणाले. जे मंडळ १० वर्षांपासून गणेशोत्सव साजरे करतात त्यांना पाच वर्षांची परवानगी एकदाच काढण्याची तरतूद महापालिका करेल असेही आयुक्तांनी सांगीतले. मात्र मंडळांकडून तशी मागणी येणे गरजेचे आहे. यामध्ये सिडकोच्या भूखंडांची ना हरकत मिळवणे क्रमप्राप्त राहणार आहे. महापालिकेची परवानगी घेऊनच फलकबाजी करावी. अडथळा ठरणा-या फांद्याची छाटणी आणि गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजविण्याचे आदेश या बैठकीत पालिकेच्या अधिका-यांना आयुक्तांनी दिले.