नवी मुंबईत गतवर्षांत केवळ ४८ चालक दोषी

रिक्षाचालकांची अरेरावी, अतिरिक्त भाडे मागणे, विशिष्ट ठिकाणी नेण्यास नकार देणे अशा तक्रारी काही नव्या नाहीत, मात्र नवी मुंबईतील रिक्षाचालक सुधारल्याचे त्यांच्याविरोधातील तक्रारींच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. २०१५मध्ये १५० वाहने दोषी आढळली होती, ही संख्या २०१६ मध्ये ४८ वर आली आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने तक्रारींसाठी हेल्पलाइन व ई-मेलची सुविधा दिल्यामुळे व विशेष कारवाई हाती घेतल्याने रिक्षाचालक सुधारले आहेत, असे आरटीओचे म्हणणे आहे.

नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने हेल्पलाइन सुरू केल्यापासून त्याला मिळणारा प्रतिसाद आणि त्यावर होणारी कारवाई यामुळे रिक्षाचालकांनी मवाळ पवित्रा घेतला आहे, २०१४मध्ये १५५ वाहने दोषी आढळली होती, त्यातील १२१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. संबंधित रिक्षाचालकांकडून १ लाख ७० हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. २०१५मध्ये १५० दोषी वाहने दोषी आढळली त्यापैकी ९१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्या वर्षांत वाहनचालकांकडून २ लाख १७ हजार इतकी दंडात्मक वसुली करण्यात आली. २०१६ मध्ये तक्रारींच्या संख्येत लक्षणीय घट झाली असून वर्षभरात केवळ ४८ वाहने दोषी आढळली त्यातील ३३ प्रकरणे निकाली काढण्यात आली. रिक्षाचालकांकडून १ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.

यासंदर्भात नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी सांगितले की, २०१४ व २०१५ मध्ये दंडाची रक्कम कमी होती. परंतु आता दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे. एका गुन्हय़ामुळे २००० रुपयांपेक्षा जास्त दंड भरावा लागतो. त्यामुळे रिक्षाचालक सौजन्याने वागत आहेत. २०१६पासून तक्रार आल्यास रिक्षा १० दिवस जमा केली जाते व दंडाची रक्कम द्यावी लागते, त्यामुळे रिक्षाचालक सुधारले आहेत.

बेकायदा रिक्षांना पेट्रोल पंप चालकांकडून सीएनजी देण्यात येत होता. पण नवी मुंबई क्षेत्रातील तीन पेट्रोल पंपचालकांवर कारवाई करण्यात आल्याने पेट्रोल पंपचालकदेखील सीएनजी देत नाहीत. आरटीओही आपल्या कर्मचाऱ्यांना प्रवासी म्हणून पाठवून तपासणी करते. त्यात रिक्षाचालक दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाते. त्यामुळे रिक्षाचालक धास्तावले असून तक्रारींत घट झाली आहे. रिक्षाचालक प्रवाशांशी उद्धटपणे वागल्यास १८००२२५३३५या हेल्पलाइनवर संपर्क साधावा.

– संजय डोळे, नवी मुंबई , उपप्रादेशिक परिवहन अधिकारी