शिक्षक मतदारसंघाप्रमाणे राज्यातील निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी राखीव मतदारसंघांची रचना करण्यात यावी, जेणेकरून निवृत्त पोलिसांच्या समस्यांना विधानसभेत वाचा फोडता येईल, अशी अपेक्षा निवृत्त पोलिसांच्या राज्यस्तरीय मेळाव्यात व्यक्त करण्यात आली. निवृत्तीनंतर आपल्याला सन्मानाची वागणूक मिळावी असे वाटत असेल तर सेवेत असताना पोलिसांनी सर्वसामान्यांना चांगली वागणूक देण्याची आवश्यकता असल्याचा सल्ला नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी या मेळाव्यात दिला.
निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी असोसिएशनच्या वतीने राज्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचा एक मेळावा रविवारी वाशी येथे आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी असोसिएशनचे महासचिव सुखानंद साब्दे यांनी राखीव मतदारसंघांची अपेक्षा व्यक्त केली. त्यासाठी संघटना पाठपुरावा करणार असल्याचेही सांगितले. संरक्षण दलाप्रमाणे पोलिसांनाही वन रॅन्क पेन्शन मिळावी, अशी मागणी या वेळी मांडण्यात आली. पोलीस सेवेत असताना शहीद झालेल्या पोलिसांच्या पाल्यांचे शिक्षण व विवाहकार्य यासाठी संघटना एक प्रयत्न करणार असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. राज्यातील पोलिसांना अनेक कामात पोलीस मित्रांची गरज भासते, अशा वेळी निवृत्त पोलिसांना प्राधान्य देऊन त्यांच्या अनुभवाचा उपयोग पोलिसांनी करण्याची आवश्यकता असून शासनाने त्यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे. सेवेत असताना सर्वसामान्यांना चांगली वागणूक देणाऱ्या पोलिसांना निवृत्तीनंतर चांगलाच अनुभव येत असल्याने पोलिसांनी याची जाणीव ठेवणे आवश्यक असल्याचे पोलीस आयुक्त नगराळे यांनी स्पष्ट केले.
पोलीस वेल्फेअर फंडातून बांधण्यात येणारी सभागृह निवृत्त कर्मचाऱ्यांनाही त्याच दराने मिळावेत यासाठी पोलीस महासंचालकांना मान्य असून लवकरच त्याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती नगराळे यांनी दिली. पोलीस सेवेत असतानाच निवृत्तीनंतरच्या वैद्यकीय सेवेची तरतूद करण्याची गरज असल्याने प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याने सेवेत असताना महिनाकाठी दोनशे ते तीनशे रुपये वैद्यकीय सेवेसाठी बचत करावेत, असा सल्ला नगराळे यांनी दिला. राज्यातील सर्व पोलिसांचा वाशीत आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याला पोलिसांनी त्यांच्या कुटुंबासह चांगली हजेरी लावली होती.