उरण : शुक्रवारी सकाळी जेएनपीए बंदरातून जाणारे हजारो कंटेनर वाहने अडकून पडली आहेत. जेएनपीए बंदर ते करळ उड्डाणपूल, द्रोणागिरी औद्योगिक परिसर धुतुम,चिर्ले ते गव्हाण फाटा असा तब्बल दहा किलोमीटर लांबीच्या कंटेनर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीत उरण वरून जाणारी अनेक प्रवासी वाहनेही अडकली होती. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचाही खोळंबा झाला होता. ही कोंडी दूर करण्यासाठी उरणच्या वाहतूक विभागाकडून प्रयत्न सुरू होते. पनवेल, नवी मुंबई आणि पुण्याच्या दिशेने जाणारी कंटेनर वाहनांच्या तीन तीन रांगा लागल्या होत्या. यातील एक रांग सुरू करण्यात उरणच्या वाहतूक पोलिसांनी यश आले आहे. त्यामुळे काही प्रमाणात या मार्गावरील कंटेनर वाहतूक सुरू झाली असल्याची माहिती उरणच्या वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल दहिफळे यांनी दिली आहे.
सिंगापूर बंदराच्या वाहतुकीवरही परिणाम : जेएनपीएच्या सिंगापूर बंदरातून येणारी वाहतूक ही जसखार ते करळ उड्डाणपूलावर मोठ्या प्रमाणात कंटेनर वाहनांची वाहतूक झालेली होती. त्यामुळे करळ उड्डाणपूलावरून मुंबई, पनवेल आणि पुण्याच्या दिशेने जाणारी लहान वाहने तसेच एस टी आणि एन एम एम टी या प्रवासी बसेस ही या वाहतूक कोंडीत अडकून पडल्या होत्या.
करळ ते जासई दरम्यानचा मार्ग ही कंटेनर वाहतूक मुळे मंदावला होता. दास्तान फाट्यावर यामुळे कोंडीचा सामना करावा लागत होता.