नवी मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खारघरमध्ये वर्गणी मागणीवरून परप्रांतीय दुकानदार आणि गणेशोत्सव मंडळ कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादाने चांगलाच पेट घेतला आहे. वाद इतका वाढला की मराठी-अमराठी भाषेचा मुद्दा पुन्हा एकदा नवी मुंबईत ऐरणीवर आला. मनसेने या प्रकरणात उडी घेतल्यानंतर संबंधित दुकानदाराने अखेर माफी मागितली.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना, खारघरमधील एक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्गणीसाठी परिसरातील दुकानांमध्ये गेलं होतं. यावेळी एका परप्रांतीय दुकानदाराने वर्गणी देण्यास स्पष्ट नकार दिला. इतकेच नव्हे, तर “मराठी माणसांमुळे आमचं दुकान चालत नाही”,  “मला मराठी येत नाही” , “मला मराठी शिकायचीही नाही” असे मुजोरपणे वक्तव्य त्याने केल्याचा आरोप मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. यानंतर मंडळ कार्यकर्ते आणि दुकानदारामध्ये जोरदार वाद झाला. याबाबतचा विडिओ सध्या समाज माध्यमांत प्रचंड व्हायरल होत आहे.

या वादाची माहिती पुढे जाताच स्थानिकांमध्येही संतापाची लाट निर्माण झाली. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी यामध्ये उडी घेत घटनेचा निषेध नोंदवला. मात्र, वातावरण चिघळण्याच्या आधीच संबंधित दुकानदाराने माफी मागून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. दुकानदाराने माफी मागून वादावर पडदा टाकण्याचा जरी प्रयत्न केला असला तरी या वादाची सध्या खारघर परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

या आधी काही दिवसांपूर्वीच खारघरमध्ये अशाचप्रकारचा एक वाद समोर आला होता. खारघरमध्ये पिठाची गिरणी चालवणाऱ्या एका परप्रांतीय दुकानदाराने दुकानाच्या पाटीवर केवळ हिंदी मजकूरच लिहिला होता. यावर स्थानिक नागरिकांनी मराठीतही पाटी लावण्याची विनंती केली असता त्याने टाळाटाळ करत विनंती करणाऱ्याला मुजोरपणे उत्तर दिले होते. यावेळी “मराठी बोलना जरुरी है क्या सबको?” असं विधान करताना त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा अमराठी व्यक्तीकडून मराठी माणसाला भाषेवरून डीवचण्याचा प्रयत्न झाला आहे. या प्रकरणामुळे खारघरच्या स्थानिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली आहे.

नवी मुंबईसारख्या बहुभाषिक शहरात वारंवार मराठी-हिंदी भाषिकांमध्ये निर्माण होणारे तणावाचे प्रसंग हे चिंतेची बाब ठरत आहेत. स्थानिक सण-उत्सवांच्या निमित्ताने सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रकार वाढू नये, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.