शीव-पनवेल मार्गावरील खड्डय़ामुळे तरुणाचा हात मोडला

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शीव-पनवेल महामार्गावर कळंबोली येथे खड्डय़ांमुळे झालेल्या अपघातात सौरभ सिंग या तरुणाचा हात मोडल्याप्रकरणी सायन पनवेल टोलवेज प्रा. लि. विरोधात (एसपीटीपीएल) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या २० दिवसांत कंपनीवर दाखल झालेला हा दुसरा गुन्हा आहे. याआधी नेरुळ येथे झालेल्या अपघातात एकाचा बळी गेला होता. त्या प्रकरणात कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊनही अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

सौरभ हा १९ जुलैला सायंकाळी या मार्गावरून जात होता. कळंबोली येथील पुरुषार्थ पेट्रोल पंपासमोर असलेल्या खड्डय़ांत त्याची दुचाकी आडवी झाली. सौरभच्या हाताला मार लागल्याने त्याला कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी  कळंबोली पोलिसांनी एसपीटीपीएलविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.

यापूर्वीही नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनीही या प्रश्नी विविध सरकारी प्राधिकरणांतील अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. वाशी ते पनवेल दरम्यान महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडी आणि खड्डय़ांमुळे होणाऱ्या अपघातांना कारणीभूत असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत दिले होते; मात्र आयुक्तांनी समज दिल्यानंतरही सरकारी अधिकारी व सायन पनवेल टोलवेज कंपनीने उपाययोजना केल्या नाहीत. त्यानंतर ४ जुलैला नेरुळ येथील उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात सरफराज सय्यद या तरुणाचा बळी गेल्यावर एसपीटीपीएल कंपनीचे उपाध्यक्ष पवनीत सिंग सेठी, सहउपाध्यक्ष विभुदत्ता सतपती तसेच मुख्य व्यवस्थापक रमजान पटेल आणि संजीव श्रीवास्तव या बडय़ा अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला; मात्र अद्याप यापैकी एकाही अधिकाऱ्याला अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे सामान्यांसाठी एक नियम आणि अधिकारी, कंत्राटदारांसाठी वेगळा नियम आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. रस्त्यासंदर्भात इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीचा (आयआयटी) अहवाल आल्यानंतरच आरोपींना अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे, मात्र हा अहवाल केव्हा येणार याविषयी काहीही माहिती देण्यात आलेली नाही.

रस्त्याच्या स्थितीत काहीही सुधारणा झाली नसून खड्डय़ांमुळे अपघातांचे सत्र सुरूच आहे. वाहतूक कोंडीही नित्याचीच झाली आहे.

नेरुळ येथे ४ जुलै रोजी झालेल्या अपघातप्रकरणी अद्याप ‘एसपीटीपीएल’ कंपनीच्या कोणत्याही अधिकाऱ्याला अटक करण्यात आलेली नाही. चौकशी सुरू आहे. आयआयटीच्या तज्ज्ञांचा अहवाल आल्यावर अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

– अशोक राजपूत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नेरुळ

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cops register fir against road contractor in kalamboli
First published on: 26-07-2017 at 03:21 IST