पालिका आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना

नवी मुंबई : जोखमीच्या देशातून आलेल्या २८ प्रवाशांच्या करोना चाचण्या नकारात्मक आल्याने काहीसा दिलासा मिळाला असला तरी शहरात या ओमायक्रॉन विषाणूचे संकट कायम आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने आरोग्य व्यवस्था सज्ज ठेवण्याबरोबर शहरात करोना नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी नियोजन केले आहे.

गुरुवारी सायंकाळी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेत काही आदेश दिले. यात शहरात बेफिकीरी वाढली आहे. त्याला प्रथम आळा घलणे गरजेचे आहे. त्यामुळे पालिका मुख्यालयापासूनच करोना नियमांचे पालन करण्याय यावे. पालिकेची दक्षता पथके पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवण्यात यावीत. नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी.

आरोग्य सुविधांमध्ये  वाढ करण्यात आली असून काळजी केंद्र तयार ठेवावीत. ३१ डिसेंबरपर्यंत परिस्थिती काय राहते यावर काळजी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घ्घ्ेण्यात येणार आहे.

जोखमीच्या देशातून आलेले प्रवाशांच्या चाचण्या नकारात्मक आल्या आहेत. परंतू त्याच्यावर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. रुग्णखाटांची संख्या शहरात पुरेशी असून ओमायक्रॉनमुळे तशी स्थिती उद्भवल्यास एका ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.  मात्र नवी मुंबईकरांनी या परिस्थितीत स्व:ची काळजी घेतली पाहिजे. करोना नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे.