scorecardresearch

नवी मुंबई निर्बंधमुक्त; आजपासून शहरात १०० टक्के क्षमतेने चित्रपटगृहे, नाटय़गृहे सुरू

नवी मुंबई शहरात करोनाचा पहिला रुग्ण १३ मार्च २०२० रोजी सापडला होता.

आजपासून शहरात १०० टक्के क्षमतेने चित्रपटगृहे, नाटय़गृहे सुरू

नवी मुंबई:  शहर शुक्रवारी मध्यरात्रीपासून करोना निर्बंधांमधून मुक्त होणार आहे, अशी माहिती पालिका आयुक्तांनी दिली आहे. शहरात पहिल्या लशीची मात्रा १०० टक्के लोकांना देण्यात आली असून दुसरी मात्रा घेतलेल्या लोकांची संख्याही ९८ टक्के झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहर संपूर्णपणे करोना नियमावली, निर्बंधांपासून मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवी मुंबई महापालिकेने लसीकरणाची पहिली मात्रा १०० टक्के पूर्ण तर लसीकरणाची दुसरी मात्रा ९८ टक्के झालेली असूनही ठाणे जिल्हा राज्याने दिलेल्या निकषांमध्ये बसत नव्हता. परंतु एकीकडे पालिकेने एमएमआरए क्षेत्रात सर्वात प्रथम पहिली लसमात्रा १०० टक्के लसपात्र नागरिकांना दिली होती.  तर दुसरी मात्राही ९८ टक्के पूर्ण होऊनही संपूर्ण ठाणे जिल्हा राज्य शासनाने दिलेल्या निकषांमध्ये बसत नसल्याने त्याचा फटका नवी मुंबईला बसत होता. त्यामुळे नवी मुंबई नागरिकांमध्ये नाराजीचा सूर होता. परंतु राज्य शासनाने दिलेल्या निकषामध्ये नवी मुंबई महापालिका चारही निकषांमध्ये बसत असल्याने नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये शुक्रवारी मध्यरात्रीपासून शहर १०० टक्के निर्बंधमुक्त होणार असल्याची माहिती पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. त्यामुळे मागील २ वर्षांपासून निर्बंधांच्या चौकटीत राहणाऱ्या नागरिक व सर्व आस्थापनांची सुटका होणार आहे.

महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार अगदी सुरुवातीपासूनच विशेष लक्ष देत लशींच्या उपलब्धतेनुसार लसीकरणाचे योग्य नियोजन केल्यामुळेच शहरात एमएमआरए क्षेत्रात सर्वात प्रथम नवी मुंबई महापालिकेने पहिल्या लसमात्रेचे १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले होते. राज्य शासनाच्या निकषानुसार नुकतेच मुंबई, पुणे, नागपूर, रायगडसह १४ जिल्हे गुरुवारी मध्यरात्रापासून निर्बंधमुक्त करण्यात आले होते. परंतु ठाणे जिल्ह्यातील अपुऱ्या लसीकरणाचा फटका नवी मुंबईला बसत होता. १०० टक्के लसीकरण पूर्ण होऊनही निर्बंधमुक्ती का नाही असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत होता. १८ वर्षांवरील नागरिकांना लशीचा पहिला डोस देण्याचे १०० टक्के उद्दिष्ट साध्य करणारे नवी मुंबई हे एमएमआरए क्षेत्रातील पहिले शहर ठरले होते. त्यामुळे याबाबत ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई महापालिकेने शासनाच्या नियमानुसार निकष पूर्ण केल्याने ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे गुरुवारी झालेल्या बैठकीत नवी मुंबईलाही निर्बंधमुक्त करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे शुक्रवारी मध्यरात्रीपासून शहरात उपाहारगृहे, चित्रपटगृहे, व्यापारी संकुले, मॉल्स, बार, क्रीडा संकुले, जिमखाना, स्पा, जलतरण तलाव, धार्मिक स्थळे, पर्यटनस्थळे, करमणूक केंद्र १०० टक्के क्षमतेने सुरू होत आहे.

नवी मुंबई शहरात करोनाचा पहिला रुग्ण १३ मार्च २०२० रोजी सापडला होता. त्यानंतर तीनही लाटेमध्ये पालिकेने अत्यंत चांगले काम केले होते. लसीकरणातही पालिका राज्यात अग्रेसर होती. त्यामुळे आता शहर निर्बंधमुक्त होणार असल्याने नागरिक व व्यापारी, या सर्वाना मोठा दिलासा मिळणार आहे. नव्या नियमावलीत आतापर्यंत शहरात असलेले सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत.

 मागील दोन वर्षांपासून करोनामुळे संपूर्ण जगच निर्बंधांच्या चौकटीत  होते. परंतु शासनाने निकषामध्ये बसणाऱ्यांना निर्बंधमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबई महापालिकेने केलेल्या लसीकरम्ण व इतर निकष पूर्ण होत असल्याने पुन्हा एकदा नव्या जोमाने सांस्कृतिक  वारसा जपण्यासाठी साहित्य मंदिर सभागृह सज्ज आहे.  – सुभाष कुळकर्णी, अध्यक्ष, साहित्य मंदिर, वाशी

निकषांत यशस्वी

पहिल्या मात्रेचे १०० टक्के लसीकरण पूर्ण

दुसऱ्या लसमात्रेचे प्रमाण ७० टक्क्यांपेक्षा अधिक हवे आहे. नवी मुंबई महापालिकेत दुसरी मात्राही ९८ टक्के देण्यात आली आहे. पालिका क्षेत्रात बाधितांचे प्रमाण अत्यल्प आहे. तर प्राणवायूयुक्त खाटा ४० टक्क्यांपेक्षा रिकाम्या आहेत. त्यामुळे नवी मुंबई निर्बधांमधून मुक्त झाली आहे.

मुखपट्टी बंधनकारक

शासनाच्या ४ निकषांच्या आधारे नवी मुंबई शहरातही १०० टक्के निर्बंधमुक्ती झाली असली तरी मुखपट्टी लावणे मात्र आवश्यक आहे.

शासनाने निर्बंधमुक्तीसाठी दिलेले चारही निकष पालिकेने पूर्ण केलेले असल्याने ठाणे जिल्हाधिकारी यांनी नवी मुंबई शहराला निर्बंधमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शुक्रवारी मध्यरात्रीपासून नवी मुंबई १०० टक्के निर्बंधमुक्त असणार आहे.    – अभिजीत बांगर, आयुक्त

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Corona virus infection corona restriction in movie akp

ताज्या बातम्या