लोकसत्ता प्रतिनिधी
पनवेल : पनवेलमध्ये गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या वाढत असून मंगळवारी एकाच दिवशी ८९ रुग्ण आढळले. त्यामुळे बाधितांची संख्या दिवसाला शंभपर्यंत पोहचत असल्याने प्रशासन चिंताग्रस्त झाले आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने खाटांचे नियोजन सुरू केले आहे.
पनवेल पालिका क्षेत्रात यापूर्वी एकाच दिवशी सर्वाधिक अडीचशे करोनाबाधित सापडले होते. त्यानंतर प्रमाण कमी होत दिवाळीपूर्वी दिवसाला १८ पर्यंत रुग्णसंख्या खाली आली होती. मात्र दिवाळीत मुखपट्टी न घालणे व सामाजिक अंतराचा नियम न पाळल्याने रुग्णसंख्या वाढत आहे. सध्या प्रतिदिनी ६० ते ८९ रुग्णांची नोंद पुन्हा होऊ लागली आहे.
पनवेलमध्ये आतापर्यंत २५ हजार करोनाबाधित आढळले असून त्यापैकी २३ हजार ९०० रुग्ण बरे झाले आहेत. ५७५ जणांचा मृत्यू झाला आहे. शंभरीकडे करोनाग्रस्तांची संख्या जात असली तरी शाळा सुरू करण्याचा सरकारचा मानस असल्याने पनवेलमधील २५१० शिक्षकांच्या करोना चाचणीचे नियोजन आहे.