पनवेल – चिखले गावामध्ये मंगळवारी सरपंच व त्यांच्या पतीने देहत्याग करण्याचा इशारा दिल्याने त्यांना रोखण्यासाठी गेलेल्या पनवेलच्या गटविकास अधिकाऱ्यांचे वाहन दुपारी सव्वातीन वाजता गावातून पनवेलकडे येत असताना काही ग्रामस्थांनी अडविले. याबाबत ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर १६ जणांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
पनवेलचे गटविकास अधिकारी समीर वठारकर आणि ग्रामसेवक गणेश पाटील हे चिखले गावात मंगळवारी गेले होते. गायरान जमिनीच्या प्रकरणात सरकारी अधिका-यांकडे मागणी करुनही कोणतीच कार्यवाही होत नसल्याने गावचे सरपंच दिपाली तांडेल व त्यांचे पती दत्तात्रय यांनी स्वताला मंगळवारी घरात कोंडून घेतले. त्यानंतर तिव्रता कमी झालेले फिनाइल प्यायल्यामुळे पोलिसांनी तांडेल यांच्या घराचा दरवाजा तोडून घरात शिरून तांडेल दाम्पत्यांना पनवेल येथील नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. हे आंदोलन संपल्यानंतर पनवेलचे गटविकास अधिकारी वठारकर आणि ग्राम विकास अधिकारी गणेश पाटील हे सरकारी वाहनातून गावातून पनवेल पंचायत समितीच्या कार्यालयात परत जात असताना तांडेल यांच्या मागणीप्रमाणे तातडीने संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी काही ग्रामस्थांनी लावून धरली.
गटविकास अधिकाऱ्यांचे वाहन चिखले गावातील जिल्हापरिषदेच्या शाळेसमोर तासभर अडवण्यात आल्यामुळे तेथे तातडीने पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे व त्यांचे पोलीस पथक पोहचले. ग्रामस्थ संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर ठाम होते. अखेर तासभरानंतर ग्रामस्थांची समजूत काढून सरकारी वाहन जाण्यास गावकऱ्यांनी जागा दिली असे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत ग्रामविकास अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. याबाबत मंगळवारी रात्री साडेदहा वाजता भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १८९ (२), गुन्हा दाखल करण्यात आला.
मंगळवारी तिव्रता कमी असलेले फिनाइल पिऊन चिखले गावच्या सरपंच दाम्पत्याची बुधवारी प्रकृती बरी असल्याचे सांगण्यात आले. अजूनही सरपंच व त्यांचे पती रुग्णालयात उपचारार्थ दाखल आहेत. या दरम्यान मंगळवारच्या घटनेची गंभीर दखल घेऊन पनवेलचे प्रांताधिकारी पवन चांडक यांनी बुधवारी दुपारी साडेबारा वाजता या प्रकरणी बैठकीचे पत्र काढले आहे. तसेच चिखले गावच्या १६ हेक्टर गायरान जमिनीवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची परवानगी न घेता सरपंच व कार्यकारणीतील सदस्य तसेच सरपंचांचे पती दत्तात्रय तांडेल यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांचा विरोध असतानासुद्धा ठराव घेऊन संबंधित जमिनीवर प्लॉटिंगची योजना राबविल्याने सरपंच व त्यांच्या सदस्यांविरोधात फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच सरपंच यांचे पद धोक्यात आल्याने हे पद रद्द करण्याची सूनावणी बुधवारी होणार होती. स्वत: सरपंच रुग्णालयात दाखल असल्याने ही सूनावणी आणि प्रांत अधिकाऱ्यांची बैठक पुढे ढकलावी लागणार आहे.