पनवेल : दहा दिवसांसाठी नव्याने टाळेबंदी लागू करण्यात येणार असल्याने पनवेल पालिका हद्दीतील नागरिकांनी आवश्यक शिधा साठवणूक करण्याची सूचना परिपत्रकात केल्याने गुरुवारी काही ठिकाणी नागरिकांनी सामाजिक अंतराचा नियम डावलून किराणा मालाच्या दुकानांसमोर गर्दी केली. मात्र, गुरुवारी पालिका प्रशासनाने पुन्हा दुरुस्ती करीत टाळेबंदीच्या काळात किराणा मालाची दुकाने सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. पालिकेने जारी केलेल्या परिपत्रकातील सूचनेचा अर्थ किराणा मालाची दुकाने टाळेबंदीच्या काळात बंद राहतील, असा घेतल्याने गुरुवारी धान्याच्या साठेबाजीसाठी गर्दी झाल्याचे स्पष्ट झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टाळेबंदीच्या काळात किराणा मालाची दुकाने सुरू राहण्याबाबतची ध्वनिचित्रफीत पालिकेने गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजता प्रसारित केली. अत्यावश्यक कामासाठीच नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे आवाहन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले आहे.

पालिकेच्या दोन शब्दांनी नागरिकांची धांदल उडाली. अनेक ठिकाणी सामाजिक अंतराच्या नियमाचा टाळेबंदीपूर्वीच फज्जा उडाला. जे नागरिक घरात बसून होते त्यांनी किराणा मालाच्या दूकानांसमोर गर्दी केली होती.

कठोर अंमलबजावणी

मागील दोन दिवसांपासून नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजयकुमार यांच्या नेतृत्वाखाली पनवेलमध्ये पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली. पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी पनवेल पालिकेसोबत समन्वय साधून पनवेलमध्ये कठोर टाळेबंदी लागू करण्याचे आदेश पोलीस व पालिका यांच्यात ठरले आहेत. वाहनांवर लक्ष ठेवणे सोयीचे होण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्राचे प्रवेशव्दार बंद करण्यात आले आहे. पोलिसांनी सुचविलेल्या शहर आणि वसाहतींच्या प्रवेशद्वारावर पोलीस बंदोबस्त असेल.

रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी, चारचाकी

किराणा मालाच्या दुकानांमध्ये ग्राहकांची सर्वाधिक गर्दी होती. या वेळी नोकरदार वर्गही कार्यालयात जाण्यासाठी बाहेर पडला होता. औद्योगिक वसाहतीतील कामगारांनी दहा दिवसांचे धान्य जमविण्यासाठी उद्योजकांकडून आगाऊ रक्कम घेण्यासाठी कार्यालयात धाव घेतली. बँक एटीएमबाहेर काहींनी रांगा लावल्या होत्या. कळंबोलीतील अंडीविक्रेत्यांनी दुकानातील गर्दी कमी करण्यासाठी अंडय़ांची वाहतूक करणारा टेम्पोच रस्त्यात उभा केला होता. या वेळी काही ग्राहकांनी रस्त्यातून अंडय़ांची खरेदी केली. काही मद्यविक्री दुकानासमोर ग्राहकांच्या रांगा लागलेल्या होत्या. त्यामुळे सामाजिक अंतराचा नियम पाळण्यात आला. पनवेल शहराच्या कर्नाळा सर्कल येथील बाजारपेठेत ग्राहकांना शिरण्यासाठी जागा नव्हती. रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crowds of citizens in front of grocery stores due to confusion zws
First published on: 03-07-2020 at 04:59 IST