नवी मुंबई : शहरात अनेक ठिकाणच्या पदपथांवर पथदिव्यांच्या वायरी तसेच विविध ठिकाणी ऑप्टीकल फायबर टाकल्यानंतरचे वेटोळे तसेच उघड्यावर पडलेले दिसत असल्याने पादचाऱ्यांना चालताना अडचणी येतात. वीजप्रवाह सुरू राहिल्याने विजेचा धक्का लागण्याच्या अनेक घटना समोर आल्या असल्या तरी महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

नवी मुंबई शहरात पावसाळ्यात विजेचा शॉक लागून नागरीक जखमी झाल्याच्या तसेच मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. महापालिका शहरात रस्ते, पदपथ, वीजपुरवठा, स्वच्छता, साफसफाई यासह विविध कामे करताना संबंधित ठेकेदारांकडून कामे करून घेतली जातात. परंतु, त्या कामांवर खरेच पालिकेचे नियंत्रण असते का पालिका संबंधित ठेकेदार त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष देतो का याबाबत पालिकेने खबरदारी घेणे आवश्यक आहे. पालिकेकडून शहरातील पदपथांची कामे ठेकेदाराकडून करून घेतली जातात. तसेच रस्त्यावरील खोदकाम तसेच विविध प्रकाराच्या रस्त्याखालून केबल्स टाकण्यासाठी खासगी कंपन्या पालिकेच्या परवानगीने ही खोदकामे तसेच केबल्स टाकण्याचे काम करतात. परंतू परवानगी घेतली की ठेकेदार करेल ते काम बरोबर असे न मानता त्यावर नियंत्रण व काम बरोबर झाले की नाही याची तपासणी करण्याचे काम पालिकेचे आहे.

हेही वाचा >>>पनवेल: क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची रिक्षा कलंडल्याने ९ वर्षीय बालकाचा अपघाती मृत्यू

सीवूड्स विभागात प्रेझेंटेशन शाळेच्या इमारतीबाहेरील रस्त्यालगत पदपथावरच पालिकेच्या पथदिव्यांची केबल पडून आहे. त्याचा मीटर बॉक्सही पदपथावरच पडलेला आहे. याच भागात रस्त्यावर ऑप्टीकल केबल टाकून ती रस्त्याच्या बाहेर उडली ठेवली आहे. या भागातून शाळेत जाणारे अनेक पालक विद्यार्थी या पदपथावरुन जातात.त्यामुळे या ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

शहरात दिवाबत्ती खांबांवरून विनापरवानगी विविध प्रकारच्या केबल्स टाकल्याचे शहरभर पाहायला मिळते. विविध एजन्सीकडून केबल टाकताना वायर खेचण्याच्या प्रकारामुळे दिवाबत्ती खांब पडण्याचे तसेच खांबावरील ब्रॅकेट व फिटिंगची दिशा बदलण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचे पाहायला मिळते. विद्युत खांबावर मात्र वायरीचे कोंडाळे यामुळे सौंदर्यीकरणालाही बाधा येत असून अनेकदा अपघात होत आहेत.

विद्युत विभागाचे काम करताना संबंधित ठेकेदाराने दुर्लक्ष केले असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबरच या सगळ्या कामाच्या देखभाल दुरुस्तीबाबतही दुर्लक्ष होत असेल तर त्याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.- मिलिंद पवार, अभियंता, विद्युत विभाग