५२ अतिधोकादायक इमारतींतील रहिवाशांना नोटिसा; पालिकेकडून अद्याप अधिकृत घोषणा नाही
नवी मुंबईतील सिडकोनिर्मित जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न अजून पूर्णपणे मार्गी लागला नसतानाच शहरातील राहण्यास धोकादायक इमारतींच्या संख्येत यंदा लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. यावर्षी नवी मुंबईतील एकूण ३१५ इमारती धोकादायक ठरवण्यात आल्या असून त्यात ५२ अतिधोकादायक इमारतींचाही समावेश आहे. याची अधिकृत यादी येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. परंतु अतिधोकादायक इमारतींतील रहिवाशांना घरे रिकामी करण्यासाठी नोटिसा बजावताना काही इमारतींचा पाणीपुरवठा व वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी पालिका प्रशासनातर्फे शहरातील धोकादायक इमारतींची यादी जाहीर होते. मात्र यंदा अधिकृत यादी पालिका प्रशासनाने अद्याप जाहीर केली नसली तरी, सूत्रांच्या माहितीनुसार यावर्षी ३१५ इमारती धोकादायक ठरविल्या आहेत. त्यामध्ये ५२ इमारती अतिधोकादायक आहेत. गतवर्षी धोकादायक इमारतींची संख्या १८७ इतकी होती. त्यात अतिधोकादायक इमारती ३९ होत्या.
चार वर्गात विभागणी
- राज्य शासनाने सर्व स्थानिक प्राधिकरणांना पावसाळ्यापूर्वी त्यांच्या क्षेत्रातील धोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्याचे आदेश दिलेले आहेत.
- याची वर्गवारी चार प्रकारात असून अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य अशा इमारतींची सी एक मध्ये वर्गवारी केली आहे तर सी दोन ए मध्ये इमारत रहिवाशांना खाली करण्यास सांगून तिची दुरुस्ती करणे शक्य आहे.
- सी दोन बी आणि सी तीन मध्ये रहिवाशांनी इमारत खाली न करता केवळ दुरस्ती आणि डागडुजी करून घेणे आवश्यक आहे.
रहिवासी पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत
शहरात दोन वर्षांपूर्वी सिडको निर्मित इमारतींना अडीच एफएसआय मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक रहिवाशी पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. खाडीकिनारी व समुद्राच्या पाण्यावर भराव टाकून निर्माण करण्यात आलेल्या नवी मुंबईत इमारतीचे अनेक ठिकाणी अतिशय निकृष्ट बांधकाम झालेआहे. वाशी सेक्टर नऊ-दहामधील तर काही इमारती रहिवाशांना राहण्यास लायक नसल्याचा अभिप्राय यापूर्वीच आयआयटीने दिलेला आहे. एफएसआय घेऊन इमारतींचा पुनर्विकास व्हावा यासाठी अनेक गृहनिर्माण संस्थांना संरचनात्मक अहवाल (स्ट्रक्चरल ऑडिट) तयार करून प्रस्ताव सादर केलेले आहेत. त्यामुळे धोकादायक इमारतींची संख्या यावर्षी वाढली आहे.