चिरनेरच्या आक्कादेवीच्या माळरानावरील बंधाऱ्यावर पर्यटकांकडून मद्याच्या मेजवान्या झडत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. येथे येणारे काही तरुण मटणासोबत मद्याच्या बाटल्या आणत आहेत. त्यामुळे येथील निसर्गाची हानी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
चिरनेर हे गाव महागणपतीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. अनेक सणांना या मंदिरात मोठी गर्दी होते. त्याचप्रमाणे याच गावात स्वातंत्र्यलढय़ाचा सुवर्ण इतिहासही लिहिला गेला आहे. २५ सप्टेंबर १९३०च्या चिरनेर जंगल सत्याग्रहात येथील सर्वसामान्य शेतकरी, आदिवासी, शेतमजूर, मच्छीमार, बाराबलुतेदारी करणारे व्यावसायिक यांनी सहभाग घेतला होता. अशा पवित्र ठिकाणी पर्यटकांनी धिंगाणा घालण्यास सुरुवात केली आहे. चिरनेरच्या महागणपतीच्या आवारात हुतात्मा स्मारक आहे. तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून येथील राज्य सरकारने उभारलेल्या हुतात्मा स्मारकाच्या आवारात हुतात्म्यांचे पुतळे उभारण्यात आलेले आहेत. याच परिसरात एक बंधारा आहे. हा बंधारा पावसामुळे वाहू लागला आहे. त्यामुळे उरण परिसरातील पर्यटक मोठय़ा संख्येने या बंधाऱ्यावर पावसाचा आनंद लुटण्यासाठी येऊ लागले आहेत. या बंधाऱ्यात मौजमजा करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून ज्या भूमीवर हा संपूर्ण ऐतिहासिक लढा लढला गेला. ज्या लढय़ामुळे भारतीय स्वातंत्र्य मिळाले त्याची आठवण तर सोडाच उलट येथील बंधाऱ्याच्या परिसरात मद्यपान करून येथेच धिंगाणा घातला जात आहे. त्यामुळे या रणभूमीचे पावित्र्यच धोक्यात आले आहे.
चिरनेरचा ऐतिहासिक इतिहास तसेच या गावातील भक्तीचे स्थान असलेल्या महागणपतीचे मंदिर व निसर्गाने उधळण केलेले सौंदर्य या त्रिवेणी संगमामुळे गावाला पर्यटन स्थळ म्हणून शासनाने मान्यता द्यावी अशी मागणी राज्याच्या पर्यटन विभागाकडे करण्यात आल्याची माहिती आमदार मनोहर भोईर यांनी दिली आहे. त्यामुळे येथील उरणमधील पर्यटनाला चालना मिळून भावी पिढीला लढय़ाचा इतिहास सांगता येईल. हा प्रस्ताव गेली अनेक वर्षे बासनात गुंडाळला गेला आहे. तर जिल्हा परिषद व पंचायत समिती केवळ वर्षभरातील एक हुतात्मा दिनाचा कार्यक्रम राबवीत आहे. स्वातंत्र्यसैनिकांची स्मृती असलेल्या या पवित्र्य भूमीचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी प्रशासनाने स्वीकारावी, अशी मागणी चिरनेरमधील पर्यावरण व निसर्ग संवर्धन करणाऱ्या संस्थेने केली आहे.