सात दिवसांपूर्वी पनवेल रेल्वेस्थानकाच्या पूर्वबाजूस (नवीन पनवेल) प्रवासी महिला प्रियंका रावत यांचा रात्री अकरा वाजता खून झाला. या ठिकाणी प्रवाशांची वर्दळ कमी होती मात्र सूरक्षेसाठी पोलीसही नव्हते. पोलीसच नव्हते त्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रियंका यांना वैद्यकीय उपचार मिळेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. या प्रसंगी पोलीस असते तर हा खून टळला असता, इतर प्रवाशांनी पोलिसांच्या मदतीने प्रियंका यांना रुग्णालयात वेळेत दाखल केले असते. मात्र, घटनेवेळी पोलीसच नसल्याने नागरिकांनी पुढाकार घेतला नाही, अशी शक्यता नवीन पनवेल वसाहतीमधील अश्वत्थामा जेष्ठ नागरिक संघाच्या जेष्ठांनी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- नवी मुंबई : निर्वस्त्र अवस्थेत सापडलेली व्यक्ती निघाली अट्टल गुन्हेगार, नावावर आहेत ९ गुन्हे

पोलीस चौकी उभारण्यासाठी सिडको महामंडळाकडे पत्रव्यवहार

याच अश्वत्थामा संघाच्या जेष्ठांनी २०१२ सालापासून नवी मुंबई पोलीस दल आणि सिडको महामंडळाकडे पत्रव्यवहार करुन रेल्वेस्थानकासमोरील परिसरात पोलीस चौकी व सूरक्षेची मागणी केली होती. ८ वर्षांपूर्वीच (२०१४) सिडको मंडळाने या पोलीस चौकीसाठी स्थानक परिसरात भूखंड आरक्षित केला. मात्र सरकारी काम ८ वर्षे थांब या उक्तीप्रमाणे चौकी उभारण्याचा हा प्रश्न सरकारी लालफीतीच्या कारभारात अडकला आहे.

हेही वाचा- पनवेल : प्रियांका रावत खूनाप्रकरणी सहाजणांना अटक – पोलीस उपायुक्त शिवराज पाटील

प्रवाशांसाठी अश्वत्थामा जेष्ठ नागरिक संघ कार्यरत

नवीन पनवेल वसाहतीमध्ये अश्वत्थामा जेष्ठ नागरिक संघ कार्यरत आहे. यामध्ये प्रवाशांचे प्रश्न संघातील सर्वच जेष्ठ नागरिक अग्रक्रमाने सरकारी प्रशासनासमोर मांडतात. नवीन बसची मार्गिकेची मागणी, प्रवाशांचा सूरक्षेचा प्रश्न अशा विविध प्रश्नांवर जेष्ठ नागरिक संघ काम करतो. या संघाचे अध्यक्ष प्रकाश विचारे यांनी २०१२ मध्ये राज्याचे तत्कालिन गृहमंत्री आर्. आर्. पाटील यांची भेट घेऊन पनवेल रेल्वेस्थानकाशेजारील सूरक्षेचा प्रश्न मांडला होता. याच भेटीत पोलीस चौकी या भागात अत्यंत गरजेची असल्याची मागणी केल्यानंतर राज्याच्या गृहमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे पोलीस चौकी सिडको मंडळाकडून मंजुरही झाली होती. सिडको मंडळाच्या पणन विभागाच्या अधिका-यांंनी स्थानक परिसरातील सेक्टर १७ भूखंड क्रमांक १२ वर २५ चौरस मीटरचे क्षेत्र पोलीस चौकीच्या उभारणीबाबत आरक्षित केल्याचे पत्र पोलीस विभागाला दिले आहे. या पत्रासोबत पोलीस चौकीचे ठिकाण असलेला नकाशा सिडको मंडळाने सोबत जोडला होता. पण पोलीस चौकीचे बांधकाम कोणी करायचे यावर प्रश्नचिह्न निर्माण झाल्याने अजूनही पोलीस चौकी बांधली गेलेली नाही.

रात्रीच्यावेळी पोलीस असल्यास प्रवाशांना आधार मिळेल

पनवेलमध्ये अनेक सामाजिक वास्तू बांधण्यासाठी दानशूर व्यक्तींचा शोध सूरु असतो. त्याप्रमाणे नवीन पनवेल रेल्वेस्थानक परिसरातील पोलीस चौकीच्या वास्तुलाही कोणी तरी दानशुर व्यक्ती मिळावी अशीच भावना पोलीसांची असावी असे वाटण्यासारखी ही परिस्थिती आहे. रात्रीच्यावेळी पोलीस येथे असल्यास सर्व प्रवाशांना आधार वाटेल. मात्र त्यामध्ये पोलीस कर्मचारी असले पाहीजेत. नाहीतर चौकी आहे आणि पोलीस गायब अशी स्थिती उदभवेल, अशी भीती नवीन पनवेलमधील प्रवासी जितेश धुळप यांनी व्यक्त केली आहे.

पोलीस चौकी कार्यान्वित करणे गरजेचे

नवीन पनवेल रेल्वेस्थानकातील प्रवाशांची वाढती वर्दळ आणि वाढणारे गुन्हेगारी कृत्य लक्षात घेऊन मंजूर झालेली पोलीस चौकी कार्यान्वित करणे गरजेचे आहे. अश्वत्थामा जेष्ठ नागरीक संघाने यामध्ये पाठपुरावा केला होता, असे मत श्वत्थामा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश विचारे यांनी व्यक्त केलं आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand for police station in panvel railway station area after priyanka rawat murder dpj
First published on: 22-09-2022 at 09:54 IST