नवी मुंबई : नवी मुंबईतील दस्त घोटाळ्याची दखल राज्याच्या विधिमंडळाचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी घेतल्याने मंगळवारी मंत्रालयात झालेल्या विविध सरकारी विभागांच्या बैठकीमध्ये या प्रकरणाची पुढील १५ दिवसांमध्ये मुद्रांक नोंदणी शुल्क विभागाच्या उच्चपदस्थ अधिका-यांनी पुन्हा सखोल चौकशी करून स्वता उपस्थित राहण्याच्या सूचना उपाध्यक्षांनी दिल्याने या प्रकरणातील अधिकारी व दलाल संस्कृतीला हादरा बसला आहे. जून महिन्यात अवघ्या १० दिवसांत ८४२ अनधिकृत बांधकामांचे दस्त नवी मुंबईतील सह दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक ८ येथे नोंदणी केले होते.

विधानसभा उपाध्यक्ष बनसोडे यांनी मंत्रालयात बोलावलेल्या मंगळवारच्या संयुक्त बैठकीमध्ये नवी मुंबई महापालिकेचे राहुल गेठे, नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाचे अधिकारी संजय चव्हाण, पोलीस प्रशासनाचे कोपरखैरणे येथील पोलीस अधिकारी, सिडको मंडळाचे अनधिकृत बांधकाम नियंत्रक जगन्नाथ विरकर आणि तक्रारदार भास्कर झरेकर ही मंडळी या बैठकीमध्ये उपस्थित होते. ज्या विभागामध्ये हे सर्व प्रकरण घडले त्या विभागाच्या उच्चपदस्थांनी या बैठकीकडे पाठ फीरवल्याचे चित्र होते. त्यामुळे उपाध्यक्षांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांना हजर राहण्याची सूचना केली. तसेच हा संपुर्ण प्रकार संघटितपणे केल्याचे प्राथमिक तपासात दिसत असल्याने सह दुय्यम निबंधक राजकुमार दहिफळे यांना निलंबित करून या प्रकरणी मार्ग निघणार नाही तर दहिफळे यांच्या मागे कोण आहे याची शहनिशा करून दोषींवर कारवाई करा अशा सूचना उपाध्यक्ष बनसोडे यांनी केल्याची माहिती या प्रकरणातील तक्रारदार भास्कर झरेकर यांनी दिली.

दस्त घोटाळ्याचे काय प्रकरण…

नवी मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते, वकील आणि काही राजकीय पक्षांच्या पदाधिका-यांनी विविध तक्रारी अर्जातून या प्रकरणात काहीतरी काळंबेर असल्याचा संशय शासनाचे अपर सचिव विनायक लवटे यांच्याकडे तक्रारी अर्जाने व्यक्त केल्यानंतर सचिव लवटे यांनी या प्रकरणी तातडीने चौकशीचे आदेश दिल्यामुळे या प्रकरणाला वाचा फुटली. या प्रकरणी नोंदणी उपमहानिरीक्षक आणि उपनियंत्रक राहुल मुंडके यांच्या समितीने चौकशी केल्यानंतर १० दिवसात नवी मुंबईतील क्रमांक ८ च्या कार्यालयात ८४२ दस्त नोंदणी केल्याचे समोर आले. याबाबतचा अहवाल शासनाकडे सुपूर्द केल्यानंतर सचिव लवटे यांनी तातडीने दस्त नोंदणी करणा-या राजकुमार दहिफळे यांना निलंबित करून चौकशी करण्याचे आदेश दिले. मात्र १५ दिवसानंतर नोंदणी विभागाच्या उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण यांनी त्यांना निलंबित केले. या प्रकरणी मुख्य सूत्रधार मोकाट असल्याचा संशय व्यक्त करत सखोल चौकशी आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते भास्कर झरेकर यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्याकडे केली होती