नेरुळ येथील मैदानाची महापालिका आयुक्तांकडून पाहणी

नवी मुंबई :  फिफा आणि आशियाई करंडक स्पर्धेच्या निमित्ताने शहरातील नेरुळ येथील मैदान सरावासाठी विकसित करण्यात आले आहे. या मैदानाची महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पाहणी केली. या वेळी त्यांनी स्पर्धा झाल्यानंतर ही मैदाने शहरातील फुटबॉल खेळाडूंना उपलब्ध करून देण्यात येतील. यातून दर्जेदार व्यावसायिक संघ निर्माण करून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे असे आदेश आयुक्तांनी क्रीडा विभागास दिले.  

१७ वर्षांखालील महिला आशियाई फुटबॉल करंडक स्पर्धा २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत होत असून या स्पर्धेच्या शुभारंभाचा सामना तसेच अंतिम सामना नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डॉ. डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये खेळविला जाणार आहे. या जागतिक स्तरावरील स्पर्धेचे यजमानपद नवी मुंबई शहराला लाभलेले असून या स्पर्धेचे सराव सामने नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेक्टर १९ नेरुळ येथील डॉ. यशवंतराव चव्हाण फुटबॉल मैदानामध्ये होणार आहेत. यापूर्वीही सन २०१७ मध्ये फिफा – १७ वर्षांखालील पुरुष विश्वचषक स्पर्धेचे काही सामने नवी मुंबईत खेळविण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा या आशियाई स्पर्धेच्या निमित्ताने नवी मुंबई यजमानपद भूषवीत आहे.

 नेरुळ येथील हे मैदान या स्पर्धेकरिता विकसित करण्यात आले आहे. या  क्रीडांगणाची व तेथील सुविधांची महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यासह पाहणी केली. जगभरातून येणाऱ्या खेळाडूंना कोणत्याही प्रकारची असुविधा होऊ नये यादृष्टीने सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या स्पर्धाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने फिफा आयोजकांच्या तांत्रिक समितीने महानगरपालिकेच्या क्रीडा व अभियांत्रिकी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत यशवंतराव चव्हाण फुटबॉल क्रीडांगणाची व तेथील सुविधांची दोनदा पाहणी केली आहे. त्या अनुषंगाने शॉवर सुविधेसह ड्रेसिंग रूम, रेस्ट रूम, वेटिंग लाँज, स्टोअर रूम अशा आवश्यक सुविधांची तसेच पुरेशा प्रमाणात प्रकाश व्यवस्थाही करण्यात आलेली आहे.

सांघिक खेळांमधून व्यक्तीचा विकास होतो. फुटबॉल, हॉकीप्रमाणेच खो-खो, कबड्डी अशा देशी खेळांनाही प्रोत्साहित करण्याची भूमिका आहे. यापुढील काळात नवी मुंबई महानगरपालिका यादृष्टीने नियोजनबद्ध काम करेल.

अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका