Devendra Fadnavis at Navi Mumbai International Airport Inauguration : बहुप्रतीक्षित नवी मुंबई विमानतळाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (८ ऑक्टोबर) उद्घाटन करण्यात आलं. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के. राममोहन नायडू, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणात चौथ्या मुंबईसंदर्भात मोठी घोषणा केली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “या विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी दी. बा. पाटील यांच्या स्मृतीस मी उजाळा देतो. हा स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. या विमानतळाची संकल्पना १९९० च्या दशकातील होती. अनेक वर्षे येथे केवळ एक फलक होता. विमानतळ मात्र उभारण्यात आलं नव्हतं. काम पुढे सरकत नव्हतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात आणि महाराष्ट्रात सरकार आलं आणि या विमानतळाच्या कामाला वेग आाला. मोदींनी सुत्र हाती घेतल्यानंतर सगळ्या प्रकल्पांचा रिव्ह्यू घेतात. त्या प्रगतीच्या अंतर्गत हे विमानतळ त्यांनी घेतलं आणि कामाला वेग दिला.”
मुख्यमंत्री म्हणाले, “या विमानतळासंदर्भात आठ एनओसी प्रलंबित होत्या. त्यानंतर मोदी यांनी याविषयी बैठक घेतली. त्यानंतर काही तासांत सात एनओसी मिळाल्या. त्यावर त्यांनी आठव्या एनओसीसंदर्भात प्रश्न उपस्थित केले. प्रशासनाने त्यावर काम केलं आणि १५ दिवसांत आठवी एनओसी मिळवली आणि आज या ठिकाणी सुंदर असं विमानतळ उभं राहिलं आहे.”
या विमानतळामुळे महाराष्ट्राचा जीडीपी एका टक्क्याने वाढणार : मुख्यमंत्री
“या विमानतळासाठी आपण डोंगर सपाट केला, नदीचं पात्र वळवलं, अशा अनेक गोष्टी केल्या. मी खात्रीने सांगतो की हे एक विमानतळ महाराष्ट्राचा जीडीपी एका टक्क्याने वाढवू शकतो. या विमानतळाला आता वॉट टॅक्सीची देखील सुविधा मिळणार आहे.”
आता चौथी मुंबई उभारणार : देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. तसेच नागरी उड्डाण मंत्रालयाचेही आभार मानतो. नागरी उड्डाण मंत्री के. नायडू मघाशी म्हणाले, ‘आपलं पुढचं लक्ष्य हे वाढवण बंदर असेल.’ हे बंदर मोदी यांनी आपल्याला भेट म्हणून दिलं आहे. तिथेच देशातील पहिलं ऑफशोर विमानतळ (Offshore Airport) उभारणार आहोत. आपल्या नवी मुंबई विमानतळाजवळ तिसरी मुंबई होणार आहे. वाढवणजवळ चौथी मुंबई होईल असा विश्वास मी यानिमित्ताने तुम्हाला देऊ इच्छितो.