नवी मुंबई : वाशी सेक्टर १७ मधील नेहमीच गजबजलेला परिसर मानल्या जाणाऱ्या महाराजा मार्केट परिसरात काही गर्दुल्ल्यांकडून एका महिलेची छेडछाड केल्याचा प्रकार घडल्याने नागरिकांचा संताप उसळला. दोन ते तीन गर्दुल्ल्यांनी रात्रीच्या वेळी आडोशाचा फायदा घेत महिलेच्या अंगावर हात टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेच्या आरडाओरड्यानंतर तात्काळ धावून आलेल्या नागरिकांनी छेडछाड करणाऱ्या गर्दुल्ल्यांना चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
घटना घडलेल्या परिसरात भाजी मार्केटसह कॉर्पोरेट कार्यालये, मॉल, विविध दुकाने आणि काही अंतरावर रेल्वे स्थानक असल्यामुळे हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. मात्र, तरीही या भागात आज रात्री (१० सप्टेंबर) ८ च्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. महिला आपल्या मैत्रिणीसह या रस्त्याने जात असताना पदपथावर उभ्या असलेल्या काही गर्दुल्ल्यांनी तिच्या अंगावर हात टाकण्याचा प्रयत्न केला. अमलीपदार्थांच्या नशेत असलेल्या या गर्दुल्ल्यांना नागरिकांनी जाब विचारला असता ते धड उत्तरही देऊ शकत नव्हते. अखेर संतप्त जमावाने त्यांना चोप देत पोलिसांच्या हवाली केले.
गर्दुल्ल्यांचा सुळसुळाट, महिला असुरक्षित
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, महाराजा मार्केट परिसरात गेल्या काही महिन्यांपासून गर्दुल्ल्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सार्वजनिक ठिकाणी दारू, गांजा आणि इतर व्यसनांचा अड्डा निर्माण झाल्याने महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, हे गर्दुल्ले या पदपथावर उभे राहून नेहमीच महिलांना वाईट नजरेने पाहत असतात. यावेळी मात्र त्यांनी उघडपणे अंगावर हात घालण्याचे धाडस केले. त्यामुळे पीडित महिला आणि नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त करत यांच्यावर कठोर कारवाई करून, यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
गर्दुल्ल्यांचा बंदोबस्त करा, अन्यथा नागरिक स्वतःहून कारवाई करतील
वर्दळीच्या ठिकाणी अशी घटना घडणे धक्कादायक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. एकीकडे नवी मुंबई पोलीस अमलीपदार्थांविरोधात मोहिमा राबवितात; पण शहरातील गर्दुल्ल्यांना हे पदार्थ सहज उपलब्ध होतातच कसे? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. आज वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने महिला बचावली, पण एखाद्या निर्जन भागात महिलेवर किंवा अन्य कोणावरही अशी वेळ आली असती तर जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांनी यावेळी उपस्थित केला आहे.
प्रशासनाने याकडे डोळेझाक केली तर यापुढे नागरिक स्वतःहून कारवाई करतील, असा इशारा जमावाने दिला आहे. सध्या वाशी पोलिसांकडून या गर्दुल्ल्यांना ताब्यात घेण्यात आले असून, याप्रकरणी अधिक चौकशी करण्यात येत आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या गर्दुल्ल्यांचे काही साथीदार जमावाच्या ताब्यातून पळ काढण्यात यशस्वी झाले असून, पोलिसांकडून त्यांचाही शोध सुरु आहे.