नवी मुंबई: नवी मुंबई पोलीस आयुक्तालय मार्फत गेल्या पाच वर्षांपासून नशा मुक्त नवी मुंबई अभियान राबवले जात आहे. आयुक्त बदलले मात्र हा उपक्रमण नवीन आयुक्तांनीही पुढे नेत अनेक कारवाई केल्या आहेत. आता यात केवळ अमली पदार्थ प्रतिबंध कलमच नव्हे तर संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कलमांतर्फत कारवाई केली जाणार आहे. अशा प्रकारे नुकत्याच झालेल्या कारवाईत सहा जणांच्या विरोधात संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कलमान्वये कारवाई केली असून यात अन्य काही संशयित फरार आहेत.

उषा रोशन नाईक, शैलश बसन्ना नाईक उर्फ पिल्लु, ज्योती निलेश नाईक, निलेश बसन्ना नाईक, रोशन बसन्ना नाईक व शांताबाई किसन करंडेकर, असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे असून हे सर्व दिघा येथील रहिवासी आहेत. ११ तारखेला अमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांना दिघ्यांच्या काही जण मेफेड्रॉन या अंमली पदार्थाचे वितरण करीत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर सापळा रचून सहा संशयित आरोपींना अटक करण्यात आले. त्याच्या कडे ७५ लाख ६९ हजार रुपये किमतीचे २५२.३ ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन आढळून आले. ते जप्त करण्यात आले आहे. याच टोळीतील ठाण्यात राहणारा सचिन कणसे उर्फ काका याचा शोध घेण्यात येत आहे.

या गुन्हयाचा तपास सुरू असताना टोळी प्रमुख अटक आरोपी शांताबाई किसन करंडेकर हिने इतर आरोपींसह अन्य टोळी सदस्यांनी मागील अनेक वर्षापासून अंमली पदार्थ विक्रीचे गंभीर गुन्हे केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच नवी मुंबईतील रबाळे व आजुबाजूच्या परिसरात टोळीचे वर्चस्व व दहशत निर्माण करण्याचे उददेशाने खुन, खुनाचा प्रयत्न, मारामारी असे गंभीर गुन्ह्यात त्यांची नावे आलेली आहेत.

हा सर्व व्यवहार एकटा व्यक्ती करू शकत नाही हि खूप मोठी साखळी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नवीन घेतलेल्या निर्णयानुसार त्यांनी सर्व आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल धस हे करीत आहेत.अशी माहिती जनसंपर्क अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांनी दिली.