निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर नवी मुंबई पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस ठाण्यांत निवडणूक कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. रॅली, छोटय़ा-मोठय़ा सभांसाठी परवानगी, पत्र व्यवहारासह कायदा सुव्यवस्थेची काळजी या कक्षामार्फत घेतली जाणार आहे.
सदर कक्ष विविध रॅली, छोटय़ा-मोठय़ा सभा, रोजच्या प्रचार फेरीसाठी परवानग्या देणार आहेच, शिवाय निवडणूक दरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष ठेवणार आहे. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात १० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असून त्याचे नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक यांच्याकडे असणार आहे.
याव्यतिरिक्त सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींशी संपर्क ठेवण्याचे काम, निवडणूक आयोग प्रतिनिधी वाहतूक कक्ष आदी विभागांशी निवडणूक समन्वय साधण्याचे काम याच कक्षाकडे आहे. उरण, पनवेल आणि नवी मुंबई भागांत २३० पोलीस अधिकारी यांचा या विशेष कक्षात समावेश आहे. पोलिसांच्या नियमित कामावर मनुष्यबळाअभावी परिमाण होऊ नये म्हणून शक्य तेवढे अधिक मनुष्यबळ मुख्यालयातील वापरण्यात येत आहे.
निवडणूक सबंधित कामे वेगाने करतानानियमित कामात अडथळा येऊ नये म्हणून या कक्षांची स्थापना करण्यात आली आहे.– पंकज डहाणे , पोलीस उपायुक्त परिमंडळ १)