नवी मुंबई : पदपथावर झालेल्या अतिक्रमणावर कारवाई करणे महापालिकेच्या कामाचा एक भाग आहे. मात्र महापालिकेनेच वाशी सेक्टर १४ येथे पदपथावरच हजेरी कार्यालय कंटेनरमध्ये थाटले आहे. वास्तविक हा रस्ता दैनंदिन बाजारहाट करण्याचा असल्याने मोठ्या प्रमाणात पादचाऱ्यांची गर्दी असते. त्यात महापालिकेनेच पदपथ अडवून ठेवल्याने कारवाई कोण करणार? असा प्रश्न पडला आहे. काही जागरूक नागरिकांनी अतिक्रमण विभागाच्या निदर्शनास हे आणून दिले आहे. मात्र त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही.

वाशी सेक्टर १४ हा रहदारीचा परिसर आहे. याच ठिकाणी एका बाजूला स्वामी विवेकानंद सांस्कृतिक भवन आहे तर जुन्या विभाग कार्यालय इमारतीखाली सेक्टर १० येथील फेरीवाल्यांना दैनंनिन बाजारासाठी मनपाने जागा दिलेली आहे. त्यात दुग्धजन्य पदार्थांची दुकाने, भाजी-फळे विक्री बाजार असल्याने मोठ्या प्रमाणात सकाळ-संध्याकाळ पादचाऱ्यांची गर्दी असते. अशा वस्तू शक्यतो घरातील ज्येष्ठ नागरिक घेण्यास येतात. तसेच पामबीच आणि वाशी-कोपरखैरणे या मार्गाला जोडणारा हा रस्ता असल्याने दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. अशा रहदारीच्या मार्गावर दोन्ही बाजूने पदपथ असून त्याचा वापर मोठ्या प्रमाणात नागरिक करतात.

हेही वाचा – नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे यांना एकनिष्ठतेचे फळ मिळाले

स्वामी विवेकानंद सांस्कृतिक भवनाच्या प्रवेशद्वारानजीकच्या पदपथावर कंटेनर कार्यालय थाटण्यात आले आहे. त्यामुळे पूर्ण पदपथ व्यापला गेला आहे. याच कंटेनरमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांचे हजेरी कार्यालय उघडण्यात आले आहे.

वास्तविक कंटेनर ज्या ठिकाणी ठेवला आहे, त्याच्या समोरील इमारतीत पूर्ण वाशी विभाग कार्यालय होते त्याच इमारतीतील एखाद्या खोलीत सदर कार्यालय उघडू शकत होते. त्यामुळे सामान्य नागरिकांना त्रासही झाला नसता अशी प्रतिक्रिया येथील रहिवासी मनोज इंगळे या ज्येष्ठ नागरिकाने दिली.

हेही वाचा – राणा दाम्‍पत्‍याची चहूबाजूंनी कोंडी, महायुतीतून आव्‍हान, भाजपमधूनही विरोध

याबाबत कामगार नेता प्रदीप वाघमारे यांनी २ फेब्रुवारीला पत्राद्वारे मनपाच्या संबंधित विभागाला फोटोसह माहिती मनपा अतिक्रमण विभागाला दिली आहे. मात्र कारवाई झाली नाही.

हेही वाचा – कंगनाविरोधात हिमाचलमधील काँग्रेस नेत्यांबरोबरच ‘राजघराणी’ एकत्र?

दीड महिना उलटूनही कारवाई नाही

फेरीवाल्यांवर नियमावर बोट ठेवत कारवाई केली जाते. पण पालिकाच पदपथ अडवून रस्ता काबीज करते तेव्हा सामान्य नागरिक कुठे दाद मागणार? त्वरित कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले मात्र दीड महिना उलटला तरी अद्याप काहीही हालचाल झालेली नाही अशी माहिती वाघमारे यांनी दिली. याबाबत वाशी अतिक्रमण विभागाला विचारणा केल्यावर हजेरी कार्यालयाची लवकरच सोय करून कंटेनर हटवले जाईल अशी माहिती देण्यात आली.