दूषित पाणी मुख्य समस्या; मुंबई विद्यापीठाच्या पर्यावरण अहवालाने महासभा गाजली

पनवेल : राज्यातील सर्वाधिक झपाटय़ाने वाढणारे शहरीकरण म्हणून पनवेलची ओळख होत असली तरी परिसराचा पर्यावरणाचा समतोल ठेवण्यास प्रशासन असमर्थ ठरल्याचे धक्कादायक वास्तव सोमवारी पर्यावरण अहवाल २०१८-२०१९ जाहीर झाल्यानंतर समोर आले.

पनवेल पालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा अहवाल सदस्यांसमोर मांडण्यात आला. यात दूषित पाणी ही पनवेलची मुख्य समस्या बनली असून वायू प्रदूषणासोबत शहरातील वाढत्या दळणवळामुळे येथील ध्वनी प्रदूषणाची मात्राही वाढली आहे. नद्यांमधील पाण्याचे नमुने घेण्याची प्रथा अद्याप महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सुरू केली नसल्याने जलस्रोतातील पाणी दूषित झाल्याची भिती या आहवालात व्यक्त करण्यात आली आहे. सोमवारी फडके नाटय़गृहात सर्वसाधारण सभेत हा अहवाल मांडल्यानंतर पूरस्थिती पनवेलमध्ये कशामुळे ओढावली या प्रश्नाचे उत्तर सभागृहाला मिळाले.

पर्यावरणाविषयीचा अहवाल मागील वर्षभरापासून मुंबई विद्यापिठाचे अर्थशास्त्र, सार्वजनिक धोरण संस्था आणि भूगोल विभागाच्या तज्ज्ञांच्या वतीने डॉ. एस. के. कोथे यांनी सादर केला. डॉ. निरज हातेकर यांच्या नेतृत्वाखाली ही समिती काम करत होती.

पनवेलमधील नागरिक दूषित पाणी पितात याला शास्त्रोक्त पद्धतीचा पहिल्यांदा आधार मिळाला आहे. विमानतळामुळे पनवेल हे औद्योगिक व व्यापारी दृष्टीकोनातून महत्व प्राप्त होणारे शहर आहे. मात्र पर्यावरण अहवालामुळे पनवेलचा खरा चेहरा राज्यासमोर आला आहे. पनवेल पालिका क्षेत्रातील कासाडी, गाडी व काळुंद्रे, घोट या नदींमधील पाण्याचे नमुणे मागील अनेक वर्षे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने घेतले नसल्याचे अहवालात म्हटले आहे. जलस्रोताचे प्रमाण कमी झाले असून भूगर्भातील शिल्लक असलेले ३० टक्के जलस्रोत कोरडे पडल्याकडे अभ्यास समितीने लक्ष वेधले आहे. जलप्रदूषणासोबत शहरातील ध्वनीप्रदूषणामुळे औद्योगिक वसाहतीसोबत पनवेल बसआगार आणि कळंबोली सर्कल ही ध्वनीप्रदूषणाची मुख्य ठिकाण बनल्याचे सांगण्यात आले. याचसोबत उत्सव व सणां व्यतिरिक्त पनवेल पालिका मुख्यालयाच्या इमारतीच्या परिसरात मोठय़ा प्रमाणात ध्वनी प्रदूषण अभ्यास गटाला आढळले आहे. पनवेल शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनसंख्या यामुळे ही वेळ आल्याचे म्हटले आहे. ध्वनी प्रदूषणाची मापके घेत असताना पनवेल पालिका इमारतीच्या जवळ, खारघर येथील उत्सव चौक येथे आणि खांदेश्वर वसाहतीमध्ये सणांव्यतिरिक्त सामान्य दिवसांमध्ये ध्वनी प्रदूषण झाल्याचे समोर आले आहे. सुमारे ८० डेसीबलहून अधिक ध्वनी प्रदूषणाची पातळी होती. पनवेलमधील उत्सव साजरे करणाऱ्या मंडळांचा फटका या अभ्यास समितीला सहन करावा लागला. नवरात्रोत्सवात खांदेश्वर येथे ध्वनी प्रदूषणाची मात्रा तपासण्याचे काम सुरू असताना अभ्यास पथकाला आयोजकांनी पळवून लावले. वाढत्या शहरीकरणासोबत मोठय़ा प्रमाणात वृक्षलागवड व संवर्धनाची शहराला गरज आहे, मात्र विकास आराखडा प्रत्यक्षात आला नसल्याचे कारण पुढे करत रस्त्याकडेला पनवेल पालिकेने झाडे लावली नसल्याचे या अहवालात समोर आले आहे. शहरीभागातील उच्चशिक्षित आणि ग्रामीण भागातील कमी शिकलेले शेतकरी हे पर्यावरण हिताची जाण ठेवून पावले उचलतात. मात्र शहरी भागातील अशिक्षितांमुळे पर्यावरण प्रदूषणात प्रभावी असतात असे पर्यावरण अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. खारघर येथे उच्चशिक्षित वर्ग मोठा असून पनवेल पालिकेच्या ग्रामीण भागात शेतकरी वर्ग मोठा असल्याने पर्यावरण पूरक नागरिक येथे असल्याचे म्हटले आहे.    पर्यावरणात बदल घडविणारे महत्त्वाचे घटक किंवा आर्थिक संरचना कोणते बदल घडतात, सद्य:स्थितीतील पनवेलची पर्यावरणाची स्थिती, प्रदूषणाची मानके, जैवविविधतेची स्थिती काय यावर विश्लेषण या अहवालात करण्यात आली आहे. अहवालासोबत महापालिकेने भविष्यात कोणत्या उपाययोजना करव्यात हेसुद्धा स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र जिवन प्राधिकरण, मुंबई महानगर प्रदेश रस्ते विकास प्राधिकरण, सिडको मंडळ, पनवेल पालिका यांच्या माहिती स्त्रोतातून काही माहिती जमा करण्यात आली.

तसेच पालिका क्षेत्रातील लोकसंख्येच्या आधारावर २० प्रभागांमधील ८०० कुटुंबांचे नऊ सर्वेक्षकांनी सर्वेक्षण केल्यानंतर माहिती संकलित करण्यात आली.