उपायोजना होत नसल्याने वाहनचालक त्रस्त

नवी मुंबई : टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी दूर व्हावी म्हणून फास्ट टॅग ही नवी योजना अमलात आली तरीही वाशी टोल नाक्यावरील टोलसाठीच्या वाहनांच्या रांगा कायम आहेत. वाशी गावापर्यंत टोलवरील ही वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालक त्रस्त आहेत. वाढत्या वाहनांमुळे गर्दीच्या वेळी दीड ते दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. मात्र याकडे पथकर प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

सहा सेकंदांत पथकर वसूल करून वाहन पुढे जाणे अपेक्षित आहे. मात्र या नाक्यावर अर्धा ते पाऊण तास वाहनचालकांना घालवावा लागत आहे. फास्ट टॅगमुळे ही समस्या सुटणे अपेक्षित होते. मात्र कोडी कायम आहे. इतर दिवशी गर्दीच्या दिवशी तर  शनिवार व रविवार दिवसभर वाहनांच्या प्रचंड रांगा लागत आहेत. मुंबईच्या दिशेला वाशी खाडी पुलाच्या मानखुर्द टोकाला, तर वाशी दिशेला वाशी गावापर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात.  याबाबत पथकर नाका प्रशासनाशी संपर्क होऊ शकला नाही. वाढत्या वाहतुकीमुळे हा पथकर नाका लहान पडत आहे. खाडीवर तिसऱ्या पुलाचे काम प्रगतिपथावर आहे. मात्र तो पूल होईपर्यत हा मनस्ताप वाहनचालकांना सहन करावा लागणार आहे. मात्र तोपर्यंत हा त्रास सहन का करावा, असा प्रश्न वाहनचालक उपिस्थत करीत आहेत.

पथकर नाक्यावर एक मार्गिका वेगळी ठेवण्याचा नियम आहे. जी मार्गिका आपत्कालीन मार्गिका म्हणून ओळखली जाते. मात्र या नाक्यावर एक तास जरी उभे राहिले तरी किमान दोन-तीन रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकलेल्या दिसून येतात, अशी माहिती एका रुग्णवाहिका चालकाने दिली.

सक्तीने वसुली

पथकर नाक्यापासून ठरावीक अंतरावर पिवळी पट्टी असते. त्याबाहेरील वाहनांना पथकर भरण्यास थांबण्याची वेळ आली तर पथकर घेतला जात नाही. मात्र या ठिकाणी सक्तीने वसुली केली जाते. याबाबत थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सार्वजनिक बांधकाममंत्री यांना ट्वीट करून कळवले आहे. मात्र परिणाम  काहीच नाही, अशी खंत अमर कडले यांनी व्यक्त केली आहे.